अशक्त गर्भवतींना मोफत लोहयुक्त डोस
By admin | Published: March 1, 2015 10:34 PM2015-03-01T22:34:33+5:302015-03-01T23:16:09+5:30
नऊ लाखांची तरतूद : जोखमीच्या प्रसूतीवेळी स्त्रीरोगतज्ज्ञ , आरोग्य विभागाचा उपक्रम
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांत आता अशक्त गर्भवतींना मोफत सलाईनद्वारे लोहयुक्त डोस दिला जात आहे. याशिवाय दुर्गम तालुक्यात आरोग्य केंद्रात जोखमीच्या प्रसूतीवेळी स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध केले जात असून माता व अर्भक मृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
गर्भवती सुदृढ राहाव्यात, अर्भक सशक्त व्हावे यासाठी आरोग्य विभागातर्फे लोहयुक्त गोळ्या दर महिन्याला आरोग्य सेविका व ‘आशा’ कार्यकर्त्या यांच्यामार्फत दिल्या जातात. मात्र, दारिद्र्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या गर्भवती पोषक आहाराअभावी सुदृढ राहत नाहीत. त्यांच्यात हिमोग्लोबीन कमी होते. अशा अवस्थेत प्रसूतीसाठी आल्यानंतर संबंधित माता किंवा अर्भक दगावण्याची दाट शक्यता असते. जिल्ह्यात अजूनही माता व अर्भक मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. अशक्त गर्भवतींचे बाळंतपण करणे जोखमीचे मानले जाते. अशा महिलांना खासगी रुग्णालयातील प्रसूतीचा खर्च पेलत नाही. परिणामी प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका व जिल्हा रुग्णालय हेच त्यांना आधार असते. शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर प्रसूती करणे जिवावर बेतत असते. त्यामुळे अशक्त गर्भवतींना हेरून सुरुवातीपासूनच लोहयुक्त डोस सलाईनद्वारे दिले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने यंदा स्वनिधीतून नऊ लाखांची तरतूद केली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्यामुळे जोखमीच्या अवस्थेतील प्रसूती करण्याचे टाळले जात होते. गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, चंदगड अशा डोंगराळ तालुक्यांत जोखमीच्या प्रसूतीवेळी स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. गर्भवतींना आरोग्य केंद्रापर्यंत आणणे व उपचार करणे मोफत केले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने स्वनिधीतून १० लाखांची तरतूद केली आहे. याचा सर्वाधिक फायदा गरीब गर्भवतींना होणार आहे. ( प्रतिनिधी )
अशक्त गर्भवतींना सलाईनद्वारे मोफत लोहयुक्त डोस दिले जाणार आहेत. जोखमीच्या प्रसूतीवेळी स्त्रीरोगतज्ज्ञ मिळणार आहे. या उपक्रमाद्वारे माता व अर्भक मृत्यू रोखण्याचा प्रयत्न आहे. सर्वच प्राथमिक आणि उपकेंद्रांत सुविधा दिल्या जात आहेत. गरीब गर्भवतींना याचा चांगला लाभ होत आहे. प्रभावी अंमलबजावणीमुळे सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.
- डॉ. आर. एस. आडकेकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी