कोल्हापुरातील सीपीआरमध्ये मोफत लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया, प्रसिद्ध सर्जन डॉ. लकडावाला यांच्यावर जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:05 IST2025-02-04T12:03:29+5:302025-02-04T12:05:05+5:30
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध रोबोटिक व लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ.मुफ्फझल लकडावाला हे सीपीआरमध्ये हर्निया, अपेंडिक्स, ...

कोल्हापुरातील सीपीआरमध्ये मोफत लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया, प्रसिद्ध सर्जन डॉ. लकडावाला यांच्यावर जबाबदारी
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध रोबोटिक व लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ.मुफ्फझल लकडावाला हे सीपीआरमध्ये हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय तसेच गर्भाशयावरील मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत. संबंधित रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी नोंदणी करावी असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे.
या अनुषंगाने शेंडा पार्क येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. संजय रणवीर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
लॅपरोस्कोपीक शस्त्रक्रिया ही विनाछेद शस्त्रक्रिया असून यामध्ये कुठल्याही प्रकारची शरीराची चिरफाड न करता शस्त्रक्रिया केली जाते. पहिल्या टप्प्यात ५० शस्त्रक्रिया होणार आहेत. यानंतर रुग्णसंख्येचा विचार करून पुढचे शिबिर घेण्यात येईल. ज्या रुग्णांना हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय तसेच गर्भाशय याबाबतची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी तातडीने सीपीआर ओपीडी खोली क्रमांक १०७, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नाव नोंदणी करण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.
डॉ. लकडावालांनी ५० हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केल्या
डॉ. लकडावाला हे डॉ. मुफी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते भारतातील प्रसिद्ध लॅपरोस्कोपिक सर्जन आहेत. बॅरिएट्रिक आणि गॅस्ट्रो-इंटेस्टाइनल शस्त्रक्रियांमध्ये तेे विशेषज्ञ असून ते डायजेस्टिव्ह हेल्थ इन्स्टिट्यूटचे सह-संस्थापक आणि मुख्य शल्यचिकित्सक आहेत. भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ५० हजारांहून अधिक जीव वाचवणाऱ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.