नोंदीत बांधकाम कामगारांना आजपासून मोफत जेवण, मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन : कामगार मंत्रालयाची योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:35+5:302021-07-02T04:17:35+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना आज (शुक्रवार)पासून मोफत जेवण मिळण्याची सुविधा सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या कामगार ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना आज (शुक्रवार)पासून मोफत जेवण मिळण्याची सुविधा सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या कामगार मंत्रालयातर्फे ही योजना राबवली जात आहे. कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ होत आहे. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील व स्वागताध्यक्ष म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सहा वाजता मार्केट यार्डातील भाजी मंडईशेजारी जिल्हा कामगार सुविधा केंद्राचे उद्घाटन होणार आहे. मध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ सयाजी हॉटेलसमोरील एलिक्सा पार्क येथे सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.
कामगार मंत्रालयातर्फे ही योजना आतापर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमधून सुरू आहे. कोल्हापुरातील या केंद्राच्या रुपाने ही योजना ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांसाठीही सुरू होत आहे. नजीकच्या काळात पनवेलसह, सांगली, सातारा, अहमदनगर, नाशिक अशा निमशहरी भागातही ही योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना दोन्हीवेळचे भोजन कामाच्या ठिकाणीच दिले जाणार आहे. या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधींसह कामगार विभागाच्या मुख्य सचिव विनिता वेद-सिंघल, राज्याचे कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री. चु. श्रीरंगम्, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे उपस्थित राहणार आहेत.
दुपारी व रात्रीचे जेवण
कोरोना महामारीच्या काळात बांधकाम मजुरांची जेवणासाठी होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ही योजना सुरू केल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. बहुतांशी कामगार हे परप्रांतीय आहेत. त्यांची तर कुटुंबेही इथे नसल्यामुळे जास्तच परवड होत आहे. अशा सर्वच नोंदीत बांधकाम कामगारांना दुपारी आणि रात्रीचे असे दोन्हीवेळचे भोजन मोफत दिले जाणार आहे.