महिनाभर मोफत बाळंतपणे
By admin | Published: November 18, 2016 12:51 AM2016-11-18T00:51:29+5:302016-11-18T00:51:29+5:30
रंगनाथ हॉस्पिटलचा उपक्रम : ‘नोटा रद्द’मुळे निर्णय; रुग्णांना दिलासा
कोल्हापूर : केंद्र सरकारने मोठ्या रकमेच्या नोटा रद्द केल्याने गोरगरिबांची कुचंबणा होत आहे. त्यातून दिलासा मिळावा यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व येथील रंगनाथ हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रवीण हेंद्रे यांनी १५ डिसेंबरपर्यंत बाळंतपणे, पोटविकारावरील अत्यावश्यक सेवा आणि स्त्री रोगाशी निगडित सर्व सेवा मोफत देण्याचे ठरविले आहे. डॉ. हेंद्रे यांनीच स्वत: निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
डॉ. हेंद्रे यांचे हे हॉस्पिटल ताराबाई पार्कातील पर्ल हॉटेलजवळ आहे. पंतप्रधानांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे सामान्य नागरिकांना चलनाची अडचण जाणवत आहे.
कोणताही रुग्ण उपचारासाठी आल्यास त्यास नकार देऊ नये, असे आवाहन कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने केले आहे. आमदार अमल महाडिक यांनीही अशा अडचणीच्या काळात रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या सगळ््या गोष्टींचा विचार करून आपण हा निर्णय घेतला आहे व शाहूंच्या करवीरनगरीत कोणी आर्थिक परिस्थिती नाही म्हणून वैद्यकीय उपचारापासून वंचित राहू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे डॉ. हेंद्रे यांनी म्हटले आहे. रुग्णांना लागणारी औषधे व भूलतज्ज्ञांची सेवा मिळाल्यास अधिक सोयीचे होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.