ऋतूराज यांच्याकडून रुग्णांना मोफत ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:19+5:302021-06-09T04:29:19+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वखर्चातून सुमारे ३५ लाख रुपये खर्चून मतदारसंघातील रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन उपलब्ध ...
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वखर्चातून सुमारे ३५ लाख रुपये खर्चून मतदारसंघातील रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी त्यांनी ५१ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी केली असून त्याचा लोकार्पण सोहळा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याहस्ते सोमवारी झाला. प्रातिनिधिक स्वरूपात संभाजीनगरातील किशोर यादव यांना त्यांच्या सासूसाठी कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला. पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोरोनामुक्त किंवा होमआयसोलेशनमधील रुग्णांसाठी ५ लीटर क्षमतेचे ५१ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. सद्या ही सुविधा दक्षिण विधानसभा मतदारसंघ मर्यादित असेल. मूळचा दम्याचा विकार किंवा फुफ्फुसाचा संसर्ग असलेल्या रुग्णांना व डॉक्टरांच्या सल्यानुसार घरी उपचार घेणाऱ्या काही कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. त्यांच्यासाठी ही कॉन्सन्ट्रेटर बँक सुविधा उपलब्ध केली आहे. लोकार्पण कार्यक्रमास आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजू आवळे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकूळचे संचालक अमरसिंह पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
कुणाला मिळणार
ज्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज असेल त्यांच्या नातेवाइकानी डॉक्टरांचे वापराबाबतचे पत्र, रुग्णाचे व यंत्र नेणाऱ्याचे आधार कार्ड, वापराबाबतचे हमीपत्र घेऊन अजिंक्यतारा कार्यालयातील सतीश कोळी यांच्याशी संपर्क साधावा.
चौकट
तिसऱ्या पिढीचे योगदान...
कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनचा बेड मिळवताना धावपळ करावी लागते. अशा काही रुग्णांची सोय होण्यासाठी आणि सामाजिक जाणिवेच्या भावनेतून आमदार पाटील यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची चांगली सुविधा निर्माण केल्याचे मंत्री यड्रावकर भाषणात सांगितले. अशाप्रकारे डॉ. डी. वाय.पाटील यांच्या समाजसेवेचा वारसा तिसऱ्याचे पिढीचे वारसदार आमदार ऋतुराज पाटील पुढे चालवत आहे, असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.
फोटो : ०७०६२०२१-कोल- ऑक्सिजन मशीन
कोल्हापुरात आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्राचा लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याहस्ते सोमवारी झाला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजू आवळे, ए. वाय. पाटील, अमरसिंह पाटील उपस्थित होते.