लहान मुलांच्या कॅन्सरच्या तपासण्या मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:31 AM2021-02-17T04:31:19+5:302021-02-17T04:31:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये लहान मुलांच्या कॅन्सरच्या तपासण्या मोफत करण्याची सुविधा दिली असून, बोन मॅरो ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये लहान मुलांच्या कॅन्सरच्या तपासण्या मोफत करण्याची सुविधा दिली असून, बोन मॅरो ट्रान्सप्लांट या उपचार पद्धतीसाठी आर्थिक मदतही केली जात असल्याची माहिती या कॅन्सर सेंटरच्या कार्यकारी व्यवस्थापक डॉ. रेश्मा पवार यांनी मंगळवारी येथे दिली. आपल्या मुलाला कॅन्सर झाल्याचे समजल्यावर हवालदिल झालेल्या पालकांना निश्चितच दिलासा देणारा हा निर्णय आहे.
भारतातील एकूण कॅन्सर रुग्णांपैकी ३.२ रुग्ण हे पंधरा वर्षांखालील मुले आहेत. म्हणजे सरासरी ६५०० रुग्णांमध्ये एकतरी लहान मुलगा कॅन्सरचा रुग्ण आहे. त्याच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी किमान ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. प्रगत राष्ट्रांपेक्षा भारतात कॅन्सरचे प्रमाण कमी असल्याचे आपण समजतो; परंतु ते सत्य नाही. कारण आपल्याकडे कॅन्सरचे निदान होण्याचे प्रमाण कमी आहे. योग्यवेळी पैशाअभावी तपासणी होत नाही. त्यामुळेच कॅन्सरचा आजार तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर गेल्यावर पालक मुलाला उपचारासाठी घेऊन येत असल्याचा अनुभव आहे. जेव्हा फारसे उपचारच करता येत नाहीत. म्हणून वेळेत निदान होण्यासाठी तपासण्या महत्त्वाच्या आहेत.
जागतिक लहान मूल कॅन्सर दिनानिमित सोमवारी (दि. १५) कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे कॅन्सर झालेली मुले आणि त्यांच्या पालकांसाठी स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये लहान मुलांना होणाऱ्या कॅन्सरबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे लहान मुलांच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र अद्ययावत विभाग आहे. तज्ज्ञ डॉक्टर अनिकेत मोहिते, डॉ. अभिजित गणपुले, डॉ. नीलेश धामणे आणि परिचारिका यांचे पथक सज्ज आहे. अतिशय सुसज्ज अशा या सेंटरमध्ये बोन मॅरो ट्रान्स्प्लांटसाठी स्वतंत्र विभाग आहे. अनेक लहान मुलांमध्ये रक्ताचा कॅन्सर होतो. तेव्हा बोन मॅरो ट्रान्स्प्लांटची गरज असते. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये तशी उपचाराची सोय आहे. बोन मॅरो ट्रान्स्प्लांटसाठी स्वयंसेवी संघटनांकडून (एनजीओ) आर्थिक मदत केली जाते.