मराठा समाजातील २० हजार युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण, एमकेसीएलच्या सहकार्याने ‘सारथी’ची योजना
By समीर देशपांडे | Published: March 23, 2023 01:09 PM2023-03-23T13:09:02+5:302023-03-23T13:09:36+5:30
व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन तालुका पातळीवर मिळताना अडचणी निर्माण होतात
समीर देशपांडे
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ संस्थेच्यावतीने मराठा युवक, युवतींसाठी मोफत व्यक्तिमत्त्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र नॉलेज काॅर्पोरेशन लि. मार्फत हे प्रशिक्षण तालुका स्तरापर्यंत देण्यात येणार आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ही योजना आखण्यात आली आहे. यातून मराठा, कुणबी, कुणबी/मराठा, मराठा/ कुणबीमधील १८ ते ४५ वयोगटातील उमेदवारांना हे व्यक्तिमत्त्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंत हे प्रशिक्षण देण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी जवळच्या एमकेसीएलच्या केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेकदा संगणक प्रशिक्षणासाठी तालुका पातळीवर संस्था असल्या तरी व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन तालुका पातळीवर मिळताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ही योजना अनेक युवक, युवतींसाठी लाभदायी ठरणार आहे.
याआधी दहा हजार युवक-युवतींना हे प्रशिक्षण देण्यात येणार होते. परंतु, ते वाढवून आता वीस हजार जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जर आणखी गरज वाटली तर संचालक मंडळ या क्षमतेत वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल. - अशोक पाटील, निबंधक, सारथी, पुणे.
मराठा समाजातील युवक, युवतींना मूलभूत प्रशिक्षण देणारी ही योजना आहे. एकूणच व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी आणि काळाची गरज असलेल्या संगणकाचे प्रशिक्षण देणाऱ्या या योजनेचा मराठा समाजातील अधिकाधिक युवक-युवतींनी लाभ घ्यावा. - वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, मराठा महासंघ