तुळजाभवानी परिसर अंधारमुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:23 AM2021-03-05T04:23:33+5:302021-03-05T04:23:33+5:30
कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहतीतील तुळजा भवानी मंदिर परिसरातील अनेक कॉलनीत संध्या रस्त्यावरील विद्युत दिवे बंद आहेत, त्यामुळे परिसरात रात्री ...
कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहतीतील तुळजा भवानी मंदिर परिसरातील अनेक कॉलनीत संध्या रस्त्यावरील विद्युत दिवे बंद आहेत, त्यामुळे परिसरात रात्री अंधार पडलेला असतो. तातडीने दिवे लावण्याची व्यवस्था करून हा परिसर अंधारमुक्त करावा, अशा मागणीचे निवेदन तेथील नागरिकांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना दिले.
तुळजा भवानी मंदिर प्रभागात सर्वे कॉलनी, संतोष कॉलनी, गोविंद कॉलनी, मारुती मंदिर परिसर गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी अंधारात असतो. याबाबत संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतू वीस दिवस होऊन गेले अद्याप या तक्रारीकडे कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी कोणीही लक्ष दिलेले नाही. अंधार असल्यामुळे रात्रीच्या वेळी चेन स्नॅचिंग यासह अन्य प्रकारातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार महापालिकेचा विद्युत विभाग आहे.
कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे काही कॉलनीत अंधार पसरत असेल आणि त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असतील, तर मात्र आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली.