महापालिका शाळेतील साडेसहा हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:28 AM2020-07-01T11:28:31+5:302020-07-01T11:31:49+5:30
कोल्हापूर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानामधून या वर्षी मोफत गणवेश मिळणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी दिली.
कोल्हापूर : महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानामधून या वर्षी मोफत गणवेश मिळणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी दिली.
समग्र शिक्षांतर्गत २०२० आणि २०२१ च्या वार्षिक कार्य योजना आणि अंदाजपत्रकाला केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिकेच्या पहिली ते आठवीतील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीची मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले अशा एकूण सहा हजार ५२८ विद्यार्थ्यांना मोफत गणवेशचा लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला २०० रुपयांप्रमाणे दोन गणवेशांकरिता ६०० रुपये अशी एकूण ३९ लाख १७ हजारांची तरतूद केली आहे. ही योजना विद्यार्थी पालक यांना दिलासा देणारी ठरेल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला. गणवेशाचा रंग प्रकार ठरवून गणवेश पुरवठा करण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
शासनाच्या ४ जून २०१९ च्या निर्णयानुसार समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत गणवेश योजनेला थेट लाभ हस्तांतरण (डीपीटी) प्रक्रियेतून कायमस्वरूपी वगळले आहे. त्यामुळे मंजूर निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर लाभार्थ्यांच्या संख्येनुसार वर्ग करण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून गणवेश पुरवठ्याबाबतची संपूर्ण कार्यवाही करण्याचे आदेश आहेत.
-रसूल पाटील,
कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका