पुढील वर्षभरही मोफत योग
By admin | Published: June 22, 2016 12:50 AM2016-06-22T00:50:24+5:302016-06-22T01:00:01+5:30
देवानंद शिंदे : शिवाजी विद्यापीठात मोफत योग शिबिराची वर्षपूर्ती
कोल्हापूर : पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून आजपर्यंत ‘योगशक्ती - योगयज्ञ’ अंतर्गत ३६५ दिवस योग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या योग उपक्रमाचा दोनशेहून अधिक साधकांनी दैनंदिन लाभ घेतला. साधकांचा हा प्रतिसाद पाहता हे मोफत योग शिबिर पुढील वर्षभरही राबविण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली.
शिवाजी विद्यापीठ व श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी यांच्यातर्फे विद्यापीठाच्या लोककला सभागृहात गेले वर्षभर सुरू असलेल्या मोफत योग शिबिराचा वर्षपूर्ती समारंभ तसेच दुसरा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभात सुमारे ३४०० योगसाधक सहभागी झाले. यामध्ये विद्यार्र्थी, शिक्षक, अधिकारी, महिला आदींचा समावेश होता.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणेनुसार २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने मंगळवारी शिवाजी विद्यापीठाच्या लोककला सभागृहात हा कार्यक्रम सकाळी ६.३० ते ८ या वेळेत पार पडला. यावेळी कणेरी येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामी, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्र्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, माणिकराव पाटील-चुयेकर, डॉ. संदीप पाटील यांच्यासह मठाचे अन्य साधक, तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व सेवक उपस्थित होते. प्रशिक्षक दत्ता पाटील यांनी साधकांकडून सुमारे दीड तास विविध योग प्रात्यक्षिके करवून घेतली. (प्रतिनिधी)
मोफत योग शिबिर
साधकांसाठी दररोज सकाळी ६ ते ७.३० या कालावधीत विद्यापीठाच्या लोककला सभागृहात निरंतर मोफत योग शिबिर होणार आहे. उत्तम आरोग्यासाठी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले.