फिरस्त्या सहा मुलांची शोषणातून मुक्तता
By admin | Published: August 12, 2015 12:35 AM2015-08-12T00:35:43+5:302015-08-12T00:35:43+5:30
पोलीस, सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार : १७ महिला, पुरुषांवर प्रतिबंधात्मक कारवाई
कोल्हापूर : शहरात विविध ठिकाणी लहान मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्या फिरस्त्या महिला, पुरुषांवर मंगळवारी दुपारी प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताब्यातून सहा मुलांची मुक्तता केली. पीडित मुलांची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांची बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख वैष्णवी पाटील यांनी पत्रकारांना दिली. लहान मुलांना भीक मागण्यास काही फिरस्त्या महिला व पुरुष सक्ती करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करून मुलांची सुटका करण्याची मागणी संयुक्त विद्यार्थी संघर्ष समितीने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे मंगळवारी केली. यावेळी डॉ. शर्मा यांनी तुमच्यासोबत पोलीस पाठवून देतो, संबंधितांवर कारवाई होईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार वैष्णवी पाटील, विद्या जाधव यांच्यासह पोलिसांच्या चार पथकांनी अंबाबाई मंदिर परिसर, उमा टॉकीज, दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, ताराराणी चौकात शोध घेतला. यावेळी १७ फिरस्त्या महिला व दोन पुरुष व त्यांच्यासोबत सात मुले आढळली. यावेळी पळून जाणाऱ्या महिला व मुलांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेले. मुलांची बालसुधारगृहात रवानगी केली. ही कारवाई संयुक्त विद्यार्थी संषर्घ समितीचे पदाधिकारी रोहित पाटील, श्वेता परुळेकर, श्रीधर पाटील, अवधूत अपराध, भारत घोडके, मंदार पाटील, संदीप देसाई, नीलेश यादव, अभिजित राऊत यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)
कामाच्या नावाखाली भीक
पोलिसांनी महिलांकडे चौकशी केली असता त्यांनी आम्ही राजस्थानचे रहिवासी असून, गांधीनगर येथे राहतो. आम्ही रस्त्यावर फिरून विकत असल्याचे सांगितले. आम्ही गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून गांधीनगरमधून सकाळी कोल्हापुरात येतो, दिवसभर विविध चौकांत, गर्दीच्या ठिकाणी जाऊन भीक मागतो, रात्री घरी जाताना दाभोळकर कॉर्नर येथे एकत्र येऊन मिळालेला पैसा आई-वडिलांना देत असल्याचे या मुलांनी सांगितले.