स्वातंत्र्यसैनिक बाबूराव हासुरे यांचे निधन, कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 04:11 PM2023-02-10T16:11:31+5:302023-02-10T16:11:50+5:30
१९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगत राहून देशासाठी त्यांनी काम केले होते
कसबा सांगाव : कसबा सांगाव येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबूराव पिरगोंडा हसुरे (वय ९६) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार रूपाली सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशीलकुमार संसारे यांनी शासनाच्या वतीने आदरांजली वाहिली. जि. प. सदस्य युवराज पाटील यांनीही पार्थिवाचे दर्शन घेतले.
१९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगत राहून देशासाठी त्यांनी काम केले होते. सरकारी चावडी, पोस्ट ऑफिस जाळणे, टेलिफोनच्या तारा तोडून दळणवळणामध्ये अडचणी निर्माण करणे, या कार्यामध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. कसबा सांगाव गावालगत महाराणी इंदुमती पार्क येथे इंग्रज अधिकारी वापरत असलेला बंगला जाळून टाकण्यात त्यांचा सहभाग होता. गारगोटी येथील सरकारी खजिना व हत्यारे लुटीमध्ये ते सहभागी होते.
भारत छोडो, चले जाव आंदोलनांमध्ये अहिंसा तत्त्वावर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, नागनाथअण्णा नायकवडी, दादासाहेब मगदूम, शिवराम मर्दाने या स्वातंत्र्यसैनिकांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यरत होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गावातील विविध संस्था स्थापनेत त्यांचा सहभाग होता. त्यांनी कोल्हापूर जिल्हा स्वातंत्रसैनिक संघटना, जिल्हा खादी ग्रामोद्योग समिती व दादासाहेब मगदूम स्मारक समितीमध्ये संचालक म्हणून काम केले आहे. ते कुमार विद्यामंदिर शाळेचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.