आजाद बचपन की ओर

By Admin | Published: February 9, 2017 10:06 PM2017-02-09T22:06:58+5:302017-02-09T22:06:58+5:30

वाचावे असे काही ( सिटी टॉक)

Freedom towards childhood | आजाद बचपन की ओर

आजाद बचपन की ओर

googlenewsNext

बाललमजूर मुक्तीच्या जागतिक कार्याची नोंद घेऊन देण्यात आलेल्या सन २०१४ च्या शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रशस्तीपत्र चोरीला गेल्याची बातमी वाचली नि मन विषण्ण झाले. सन २००४ साली तर कवींद्र रवींद्रनाथ टागोर यांचे मूळ नोबेल पदकच चोरीस गेले होते. भारतीय चोरांना सोने-नाण्यापेक्षा नोबेल महत्त्वाचे वाटते, ही भारतीय चोरांची प्रगल्भताच म्हणायला हवी! कैलाश सत्यार्थी यांचं एक सुंदर हिंदी पुस्तक आहे, ‘आजाद बचपन की ओर.’ पुस्तकाचे स्वरूप आहे लेखसंग्रहाचे; पण मुलांच्या स्वातंत्र्याची गाथा म्हणून ते वाचायला हवे. काही माणसं जन्मत:च मुळी जगण्याचं उद्दिष्ट घेऊन येतात. बाळ कैलाश शाळेत जाताना एक दृश्य नेहमी पाहत असे. एक चांभार जोडे शिवत बसलेला असायचा. त्याच्या शेजारी त्याचा मुलगाही तेच काम करायचा. ‘आपल्याएवढा मुलगा असून, तो शाळेत का येत नाही?’ या प्रश्नाने शाळकरी कैलाशला भंडावून सोडले होते. त्याने आपल्या गुरुजींना विचारून पाहिले; पण त्याला समाधानकारक उत्तर काही मिळाले नाही; म्हणून सरळ तो त्या चांभाराकडेच गेला नि त्याला थेट विचारले की, ‘तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत का पाठवत नाही?’ चांभारबाबा म्हणाले, ‘खरं तर हा प्रश्न कधीच कुणी मला केला नाही आणि खरं सांगू का, मलाही असा कधी प्रश्न पडला नाही.’ पुढे तो म्हणाला, ‘माझे आजोबा, वडील जे करीत आले तेच मी करीत राहिलो. माझा मुलगा तेच करणार. बाळ, तुला सांगू का? अरे, आमचा जन्मच मुळी मोलमजुरी करून जगण्यासाठी झालाय ना!’ बाबांच्या त्या पराधीनतेने कैलाश सत्यार्थी यांना बेचैन केलं. ती बेचैनी घेऊन कळायला लागल्यापासून गेली ३५ वर्षे अव्याहत ते मुलांना बालपण बहाल करून देण्यासाठी झटत आहेत.
‘आजाद बचपन की ओर’ हा त्यांनी गेल्या ३५ वर्षांत वेळोवेळी लिहिलेल्या अशा लेखांचा ऐतिहासिक संग्रह आहे की, ज्यांमुळे जगात बालकांचे हक्क, बालमजुरी, निर्मूलन, बालशिक्षण, बाल यौन शोषण, बालक अत्याचार, बालपण रक्षण, इ. प्रश्न जागतिक प्रश्न बनून पुढे आले. आज जगात १७ कोटी मुले-मुली बालमजूर म्हणून कार्यरत आहेत. जगातील सहा कोटी मुलांनी तरी अजून शाळेचे तोंडच पाहिलेले नाही. साडेआठ लक्ष मुले-मुली अल्पवयीन वेश्या, भिकारी म्हणून जीवन कंठतात. कितीतरी देशांतील मुलांच्या हातात पाटी-पेन्सिल येण्याऐवजी बंदूक आणि गोळ्या येतात. अंमली पदार्थ वाहतुकीत मुला-मुलींचा सर्रास वापर केला जातो. भारतात बालपण किती गुलामगिरीचं जिणं जगतं, हे ज्यांना समजून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक बालभ्रमाच्या निद्रेतून खडबडून जागे करणारं वैचारिक सुतळी बॉम्बच!
कैलाश सत्यार्थी यांच्या या लेखसंग्रहात विषयनिहाय वर्गवारी केल्याने आपणास त्या विषयाचे विविध पक्ष ते लेख समजावतात. ‘मुक्तीचे स्वप्न’ भागात बालपण विशद करण्यात आले आहे. ‘बालपणाचे स्वातंत्र्य’मध्ये बालमजुरी निर्मूलनाचा ऊहापोह करण्यात आला आहे. हे लेख ‘बालविकासाचा मार्ग बालमजुरी मुक्तीशिवाय अशक्य असल्याचे समाजभान देतात व या विषयाची जाणीवजागृतीपण.’ ‘बालविक्री’ विभाग गावबाजारात शेळ्या, कोंबड्या विकतात तशा मुलीपण विकल्या जातात, ते वाचताना आपल्याला माणुसकीची शरम वाटू लागते. मला आठवतं की, मागे विजय तेंडुलकर यांनी ‘कमला’ नावाचे नाटक लिहिले होते. त्यात बालिकांची खरेदी-विक्री चित्रीत केली होती. पत्रकार, समीक्षकांनी त्या नाटकास ‘कल्पनेचे तारे’ म्हटल्यावर उसळून त्यांनी कैलास सत्यार्थी यांची साक्ष दिली होती. विजय तेंडुलकर तर एकदा म्हणाले होते की, ‘भरल्या घरात मुलं अनाथ असतात.’ त्यावेळी त्यांनी बालसुरक्षेचा जो प्रश्न उपस्थित केला होता, तो या लेखसंग्रहात कैलास सत्यार्थी यांनी ‘बचपन की सुरक्षा’ भागात मांडला आहे. या लेखसंग्रहाचं सूत्रवाक्य आहे, ‘मैं नहीं मानता कि गुलामी की बेडीयाँ आजादी की चाहत से ज्यादा मजबूत होती है!’ हे समजून घ्यायचं तर या संग्रहातील ‘टूटेगी दासता की बेडीयॉँ’ विभागातील पाच-सहा लेख मुळातूनच वाचायला हवेत. कैलाश सत्यार्थी शिक्षणास स्वातंत्र्याचे साधन मानतात. ते स्पष्ट करणारे या संग्रहातील तीन-चार लेख वाचकास अस्वस्थ करतात. कैलाश सत्यार्थी यांचा मूळ धर्म गांधीवादी राहिला आहे. मार्क्स आणि गांधी यांच्या मुशीत तयार झालेले ते कार्यकर्ते होत.
एकेकाळी वृत्तपत्र लिखाणातून मिळणाऱ्या मानधनातून त्यांचं घर चालायचं. मी आणि ते एकाच वेळी बालकल्याण, बालविकासाचे कार्य करू लागलो होतो. त्यावेळी ते ‘बचपन बचाओ’ आंदोलन चालवीत. श्रीनिवास कुलकर्णी, सूर्यकांत कुलकर्णी विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय होते. पश्चिम महाराष्ट्रात कैलाश सत्यार्थी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ‘ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर्स’ काढला होता. बंगलोरहून महाराष्ट्रात मोर्चाने कोल्हापुरात प्रवेश केला. दोन बसेस भरून जगभरची मुक्त केलेली बालमजूर मुले, मुली, कार्यकर्ते कोल्हापुरात आले होते. यजमान संस्था होती बालकल्याण संकुल. कैलाश सत्यार्थी दिवसभर व रात्रीही आमच्या मुलांत राहिले, जेवले, झोपले. इतका साधा माणूस!
त्याकाळी शासन काखा वर करायचे. देशात बालमजूरच नाहीत म्हणायचे. कैलाश सत्यार्थी यांनी कितीतरी देशांत जागतिक निरीक्षक नेऊन फटाका, गालिचे, काचसामानाचे कारखाने दाखविले. ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ ही त्यांच्या कामाची पद्धत या सर्व पुस्तकांत उतरली आहे. शिक्षण ही काही धर्मादाय कृती नव्हे, उपकार नव्हे, तो मुलांचा हक्क आहे, हे त्यांनी ठणकावून सांगितल्यानंतर आपल्याकडे ‘सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा’ (२००९) राष्ट्रीय स्तरावर संमत झाला. ‘बालमजुरी प्रतिबंधक अधिनियम - १९८६’ आला तो सत्यार्थी यांच्यामुळे. ही सारी लढाई, संघर्ष वैचारिक अंगांनी समजून, तर ‘आजाद बचपन की ओर’ वाचनास पर्याय नाही. कैलास सत्यार्थी बालविकास, बालकल्याण कार्य दया, धर्म, पुण्य म्हणून करण्याच्या विरोधी आहेत. तो बालकांचा हक्क असून, तो बजावणे देशाचे, जगाचे ते कर्तव्य मानतात. मुलांशी त्यांचं असलेलं नातं संवेदना, समानता, सन्मान व सहाध्यायाचे राहिले आहे. समस्येचा बाऊ करण्यापेक्षा ती सोडविण्याची बांधीलकी ते महत्त्वाची मानतात. ते आशावादी आहेत. ‘जे लोग अपने आत्मविश्वास और रचनात्मक की चिनगारियों से एक छोटासा दीया जलाने का उपाय खोज निकालते हैं, उन्हें अंधेरा कभी हताश नहीं कर सकता।’ या लेखसंग्रहातील वाक्यातून उमजते. मुलांचे हक्क नाकारण्यासारखी दुसरी हिंसा नाही म्हणणारे कैलाश सत्यार्थी पंडित नेहरूंसारखेच मुलांचे ‘चाचा’ होत.
(डॉ. लवटे हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत.
प्रत्येक शुक्रवारी ते या सदरात लिहिणार आहेत.)


-डॉ. सुनीलकुमार लवटे

Web Title: Freedom towards childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.