खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:27 AM2021-08-13T04:27:29+5:302021-08-13T04:27:29+5:30
राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी पहिल्या लाटेनंतर काही अंशी हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, बार, दुकाने, आस्थापनांना नियमित वेळेप्रमाणे मुभा दिली. ...
राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी पहिल्या लाटेनंतर काही अंशी हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, बार, दुकाने, आस्थापनांना नियमित वेळेप्रमाणे मुभा दिली. त्यानंतर दुसऱ्या लाटेचा कहर सुरू झाला. त्यामुळे राज्य शासनाने २० एप्रिल २०२१ पासून काही दिवस लाॅकडाऊन आणि त्यानंतर निर्बंध लावले. त्यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. यातून हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, बारमध्ये बसून जेवण करण्यास मुभा न देता केवळ पार्सल देण्याची सुविधा दिली. त्यामुळे व्यावसायिकांनी उत्पन्नापेक्षा त्यावर होणारा खर्च परवडेनासा झाला. त्यापेक्षा व्यवसाय बंद ठेवला तर बरे होईल. या भावनेने ८५ टक्के हाॅटेल्स, रेस्टाॅरंट बंद ठेवली. त्यात कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले, तर दुकानदारांना बँकांचे कर्जाचे हप्ते, कर, कामगार पगार परवडेनासा झाला होता. त्यामुळे चेंबर ऑफ काॅमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज, कोल्हापूर हाॅटेलमालक संघ यांनी सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे हे सर्व उद्योग पूर्ण वेळ उघडे ठेवण्याची मागणी केली होती. याबाबत शुक्रवारी (दि. १३) जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार होती. तत्पूर्वी राज्य शासनाने गुरुवारी रात्री १५ ऑगस्टपासून निर्बंधमुक्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे या व्यावसायिकांना तब्बल ११५ दिवसांनी दिलासा मिळाला. अनेक हाॅटेल्स, रेस्टाॅरंट व दुकानदारांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत खऱ्या अर्थाने स्वातंतत्र्य मिळाले, अशी भावना व्यक्त केली.
यांना मिळाला दिलासा
जिल्ह्यातील हाॅटेल संख्या - ७५०
सर्व सुविधा असणारी मोठी हाॅटेल्स संख्या -१२५
हाॅटेल कामगार संख्या -६२५०
विविध दुकाने, आस्थापना - १३०००
यात काम करणारे कामगार संख्या - ८० हजार
कोट
सातत्याने पाठपुरावा व व्यापारी वर्गाची मानसिकता बघून राज्य शासनाने चांगला निर्णय घेतला. मोजमाप करता येणार नाही इतके नुकसान झाले आहे. तब्बल ११५ दिवसांनी का होईना आम्हा व्यापाऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र मिळाले.
-संजय शेटे, अध्यक्ष कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज
कोट
राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. इतक्या दिवसांनी हाॅटेल मालकांसह कामगारांना दिलासा मिळाला. आता पुणे, मुंबईतील पर्यटकांचा ओढा कोल्हापूरकडे वाढेल.
- सिद्धार्थ लाटकर, सचिव, कोल्हापूर हाॅटेलमालक संघ.