सतेज चषक फुटबॉल स्पर्धा; प्रॅॅक्टिस ‘अ’कडून झुंजार क्लबचा धुव्वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 03:50 PM2020-02-17T15:50:22+5:302020-02-17T15:52:07+5:30
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत इमॅन्युअलच्या दोन, तर कैलास पाटीलच्या एका गोलच्या जोरावर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने झुंजार फुटबॉल क्लबचा, तर पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ने खंडोबा तालीम मंडळ ‘ब’चा पराभव केला.
कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत इमॅन्युअलच्या दोन, तर कैलास पाटीलच्या एका गोलच्या जोरावर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने झुंजार फुटबॉल क्लबचा, तर पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ने खंडोबा तालीम मंडळ ‘ब’चा पराभव केला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी दुपारच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ने खंडोबा तालीम मंडळ ‘ब’चा १-० असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन केले.
त्यात ‘पाटाकडील’क डून शुभम चव्हाण, यश देवणे, साईराज पाटील, पृथ्वी चव्हाण, इम्रान मणेर यांनी, तर ‘खंडोबा’कडून स्वप्निल पाटील, सत्यम घाटगे, चेतन डोंगरे, मंदार पाठक यांनी खोलवर चढाया करीत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यात पूर्वार्धातील जादा वेळेत ‘पाटाकडील’कडून यश देवणे याने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ‘खंडोबा’कडून सामन्यात बरोबरी साधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. अखेरीस हा सामना पाटाकडील ‘ब’ने १-० असा जिंकला.
दुपारच्या सत्रातील दुसऱ्या सामन्यात प्रॅक्टिस ‘अ’ने नवख्या झुंजार क्लबचा ३-० असा धुव्वा उडविला. यात सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला इमॅन्युअलने मिळालेल्या संधीवर गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ‘झुंजार’कडून साईप्रसाद मोरबाळे, दीपराज राऊत, प्रसाद पाटील, निखिल साळोखे यांनी बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण त्यांचा ‘प्रॅक्टिस’च्या बचावफळीपुढे टिकाव लागला नाही.
उलट २६ व्या मिनिटास ‘प्रॅक्टिस’कडून कैलास पाटील याने गोलची नोंद केली. यानंतर ५२ व्या मिनिटास इमॅन्युअलने वैयक्तिक दुसरा व संघाच्या तिसऱ्या गोलची नोंद केली. ‘प्रॅक्टिस’कडून कैलास पाटील, राहुल पाटील, इंद्रजित चौगले यांनी वेगवान चाली रचल्या. त्यात कैलासने मिळालेल्या संधीवर संघाच्या तिसऱ्या गोलची नोंद केली. अखेरपर्यंत ही गोलसंख्या कायम ठेवत हा सामना ‘प्रॅक्टिस’ने ३-० असा नवख्या झुंजार क्लबचा धुव्वा उडविला.