दुकाने उघडण्याबाबत व्यापाऱ्यांची शुक्रवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:47+5:302021-07-15T04:18:47+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. तरीही सरकार व्यापार सुरु करायला परवानगी देत नाही. त्यामुळे दुकाने ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. तरीही सरकार व्यापार सुरु करायला परवानगी देत नाही. त्यामुळे दुकाने सुरु होतील, या आशेवर असलेल्या व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असून, ते अत्यंत संतप्त झाले आहेत. दुकाने उघडण्याबाबत निर्णायक भूमिका घेण्यासाठी उद्या (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजता बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी बुधवारी दिली.
शासन व प्रशासनाच्या सर्व स्तरांवर सर्व सनदशीर मार्गाने आमच्या व्यथा मांडूनही सरकारने निर्णय न घेणे म्हणजे व्यापाऱ्यांवर अन्याय आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होईल, असे अपेक्षित होते. पण व्यापार्यांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन विस्फोट होण्यापूर्वी सरकारने निर्णय घ्यावा. अन्यथा व्यापारी टोकाची भूमिका घेतील, असा इशाराही ललित गांधी यांनी दिला. व्यापार्यांची निर्णायक भूमिका जाहीर करण्यासाठी शुक्रवारी राजारामपुरी येथे कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची व्यापक बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. परंतु, तिसरी लाट येईल म्हणून व्यापार किती काळ बंद ठेवणार? कोणताही शास्त्रीय आधार नसलेला तोडगा लॉकडाऊन कोरोनावर नाही, तर व्यापारी आणि कर्मचार्यांच्या कुटुंबावर आघात करत आहे. व्यापारी आवश्यक ती खबरदारी घेतील. लसीकरण करून घेत आहेत. आता आणखी वाट बघणे शक्य नाही म्हणून ताबडतोब परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी ललित गांधी यांनी केली.