पात्र उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी शुक्रवारी मुलाखती
By admin | Published: June 13, 2015 12:44 AM2015-06-13T00:44:12+5:302015-06-13T00:49:53+5:30
संरक्षण सेवेची संधी : नाशिक येथे एस.एस.बी. प्रशिक्षण वर्ग
कोल्हापूर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी २३ जून ते २ जुलै २०१५ या कालावधीत नाशिक येथे विनामूल्य एस. एस. बी. प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आलेला आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी शुक्रवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बझार रोड, कसबा बावडा येथे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गासाठी सैन्यदलातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. याचा जास्तीत जास्त पात्र महाराष्ट्रीय तरुण-तरुणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल सुहास नाईक यांनी केले आहे.
कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण झालल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच ज्या युवकांना सशस्त्र सैन्यदलाकडून एस. एस. बी. परीक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे, अशा उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. या वर्गाचा कालावधी २३ जून ते २ जुलै असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवास, भोजनाची सोय केली आहे. तरी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी शुक्रवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रतींसह मुलाखतीस हजर राहावे, असे या पत्रकात म्हटले आहे.