पैशाच्या व्यवहारातून मित्रावर खुनी हल्ला
By admin | Published: June 25, 2015 01:17 AM2015-06-25T01:17:01+5:302015-06-25T01:17:01+5:30
दोघांना अटक : एकजण पसार
कोल्हापूर : व्यवसायातील आर्थिक व्यवहारातून मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तिघाजणांनी मित्रावर चाकूने खुनी हल्ला केला. त्यामध्ये वैभव रमेश गोंदकर (वय २९, रा. राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद) हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयित निखिल नितीन शहापूरकर (२४), पप्पू ऊर्फ अभय रणजित शहापूरकर (३०, दोघे रा. डांगे गल्ली, जुना बुधवार पेठ) या दोघांना अटक केली; तर संशयित नितीन शहापूरकर हा फरार आहे.
पोलिसांनी सांगितले, वैभव गोंदकर हा जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. चार वर्षांपूर्वी त्याची निखिल शहापूरकर याच्याशी मैत्री झाली. तो शिये येथील रेडीमिक्स कॉँक्रीट येथे कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरीस आहे. या कंपनीत तयार होणारा माल वैभवच्या नावावर घेऊन तो विविध ठिकाणी पुरवून होणारा नफा दोघांमध्ये वाटून घेण्याचे ठरले होते. त्यानुसार वैभवने तीन-चार आॅर्डरी त्याला दिल्या; परंतु त्याचे कमिशन व कंपनीचे बिल सुमारे ४५ हजार रुपये देण्यास निखिल टाळाटाळ करू लागला. त्यामुळे मंगळवारी वैभव आपला मित्र नितीन बंगडे याला घेऊन त्याच्या कंपनीत गेला. तेथील व्यवस्थापकांना दोघांतील व्यवहाराची माहिती दिली. त्यानंतर त्याला शोधण्यासाठी ते त्याच्या घरी गेले, तेथेही तो सापडला नाही.
दरम्यान, रात्री साडेदहाच्या सुमारास निखिलने फोन करून वैभवला तोरस्कर चौकातील शाहू विद्यालयाच्या मैदानावर येण्यास सांगितल्याने तो मित्र दीपक देसाई याला सोबत घेऊन गेला. याठिकाणी निखिल वैभवला ‘तू माझ्या कंपनीत का गेलास?’ अशी विचारणा करीत मारहाण करू लागला. त्यावेळी त्याचा चुलत भाऊ पप्पू रणजित शहापूरकर याने चाकूने डोक्यात वार केला. तो खाली पडल्यानंतर नितीन शहापूरकर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ते निघून गेले. त्यानंतर मित्र देसाई याने जखमी अवस्थेत त्याला ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. त्यानंतर त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. बुधवारी दोघांना पोलिसांनी अटक केली. नितीन शहापूरकर हा पसार असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)