भाजपच्या निर्णयाने मित्रपक्ष खूश
By admin | Published: April 4, 2017 01:53 AM2017-04-04T01:53:13+5:302017-04-04T01:53:13+5:30
जि.प. सत्ताकारण : सभापती निवडीत ना ईर्षा, ना चमत्कार
कोल्हापूर : पाच वर्षे सत्ता सांभाळण्यासाठी भाजपने चारही समिती सदस्यांची सभापतिपदे देऊन मित्रपक्षांना खूश केले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ४0 सदस्य सोबत असल्याचा दावा केला होता. तर दोन्ही काँग्रेसनी जोरात जोडणी सुरू असल्याचे वातावरण तयार केले. मात्र, विजय बोरगेंनी केलेले ‘भाजता’विरोधातील मतदान, रेश्मा देसाई यांनी दोन सभापती पद निवडीत उपस्थित राहून काँग्रेस-राष्ट्रवादीला केलेले मतदान आणि काँग्रेसचे सचिन बल्लाळ यांची दांडी ही या निवडीतील वैशिष्ट्ये ठरली.
जनसुराज्यने उपाध्यक्षपद न घेता दोन समित्यांची सभापतिपदे मागितली होती. कोरे यांनी आपला मतदारसंघ मजबूत करण्यासाठी सर्जेराव पाटील-पेरीडकर आणि विशांत महापुरे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला.
कागल तालुक्यात शिवसेनेच्या संजय मंडलिक गटाचा सदस्य काँग्रेसकडे तर दुसरे अमरीशसिंह घाटगे भाजताकडे आले. अमरीशसिंह हे भाजपचे नेते अरुण इंगवले यांचे जावई आहेत. इंगवले यांनी पहिल्या वर्षी अध्यक्षपद मिळत नसल्याने दुसऱ्या वेळेसाठी नेत्यांकडून शब्द घेतला आहे. त्याचवेळी अमरीशसिंह यांना सभापती पद मिळवून दिले. शिवसेनेकडे उपाध्यक्षपद असताना पुन्हा एक सभापती पद देणे शक्य नव्हते. मात्र, कागलची आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मुद्दाम घाटगे यांना पद देण्यात आले.
आवाडे गट आणि स्वाभिमानी हा जिल्हा परिषदेतील महत्त्वाचा गट. पहिल्यांदा स्वाभिमानीकडे महिला आणि बालकल्याण समितीचे सभापती पद देण्याचा निर्णय झाला. उर्वरित चारही वर्षे हे पद आवाडे गट व स्वाभिमानीकडेच राहण्याची चिन्हे आहेत. निवडीनंतर स्वाभिमानीचे सावकर मादनाईक, भगवान काटे, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. शिंदे यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वाभिमानीच्या महिला कार्यकर्त्यांही उपस्थित होत्या.
देसार्इंच्या प्रवेशाला उमेश आपटे यांचा आक्षेप
सभागृहात उशिरा आल्यावरून रेश्मा देसाई यांच्या प्रवेशाला काँग्रेसचे पक्षप्रतोद उमेश आपटे यांनी आक्षेप घेतला. यावर भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी कुणालाही मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही, असे सांगितले. पीठासन अधिकारी सचिन इथापे यांनीही उर्वरित निवडणुकीसाठी मतदान करणे त्यांचा हक्क असल्याचे सांगत या विषयावर पडदा पाडला. आपटे यांनी देसाई यांना आत घेण्यावर आक्षेप घेतला आणि देसाई यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच उमेदवारांना मतदान केले.
‘बिनविरोध’साठी हाळवणकरांचे प्रयत्न
सर्वच सभापती निवडी बिनविरोध व्हाव्यात यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी सकाळी ११ नंतर आमदार हसन मुश्रीफ, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करून ‘बिनविरोध’साठी आवाहन केले. मात्र, याबाबत पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनीच निर्णय घ्यायचा आहे, असे मुश्रीफ यांनी हाळवणकर यांना स्पष्ट केले आणि ‘बिनविरोध’चा विषय मागे पडला.
महाडिक सक्रीय..सत्तारुढ ‘भाजता’च्या सदस्यांना या निवडीच्या पार्श्वभूमीवर बेळगांवजवळच्या एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. तिथे जावून राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी कुणाला कोणते पद द्यायचे याची फिल्ंिडग लावली. तेथून त्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली. भाजपच्या जोडण्या लावण्यात राष्ट्रवादीचेच खासदार सगळ््यात पुढे आहेत असे चित्र त्यामुळे पुन्हा दिसले.
भोजेंची विनंती, बंडा मानेंचे प्रत्युत्तर
बहुमत कोणाकडे आहे हे स्पष्ट आहे. तेव्हा या निवडी तरी बिनविरोध करा, अशी विनंती भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी केली. मात्र, आधी तासभर सांगितला असता तर काही तरी विचार करता आला असता; परंतु आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. पक्षाचे म्हणून आदेश पाळावे लागतात. त्यामुळे माघार घेता येत नसल्याचे ज्येष्ठ सदस्य बंडा माने यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षांकडून वाटप
निवड झाल्यानंतर अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी चारही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन, सर्जेराव पाटील-पेरीडकर यांच्याकडे बांधकाम व आरोग्य, अमरीशसिंह घाटगे यांच्याकडे शिक्षण व अर्थ या समित्यांचा कार्यभार देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले.
घाटगेंची कपाऊंडवरून उडी, हातात भगवा
सभागृहात निवडीनंतर भाषणे सुरू होती; परंतु कागलचे घाटगे गटाचे शिवसैनिक अमरीशसिंह यांची वाट पाहत होते. घाटगे बाहेर पडले आणि घोषणा सुरू झाल्या; परंतु गेट बंदच होते. अखेर घाटगे यांनी कंपाऊंडवरून उडी मारली आणि कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेतले. घाटगे यांनी भगवा हातात घेत फिरवायला सुरुवात केल्याने कार्यक र्त्यांचा उत्साह दुणावला.