‘फॅटस्’ बरोबर मैत्री

By admin | Published: October 14, 2015 11:58 PM2015-10-14T23:58:11+5:302015-10-15T00:44:28+5:30

सिटी टॉक

Friendship with 'Fats' | ‘फॅटस्’ बरोबर मैत्री

‘फॅटस्’ बरोबर मैत्री

Next

आपल्या आहारातील सर्वांत बदनाम घटक कोणता आहे? विचार न करताही सर्वांना यांचे उत्तर माहीत आहे. फॅटस्चे कारण आपण नेहमी ऐकत असतो की, फॅटस् जास्त खाल्ले तर वजन वाढते, शरीर बेढव होते, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येतात, ह्रदयविकाराचा, पक्षाघाताचा झटका येतो, वगैरे वगैरे. प्रत्येकाला वाटत असते की, आपल्या शरीरात फॅटस् तेवढे नसावेत. कुणी फॅटस्ना ओझे असे म्हणतात, कुणी टायर म्हणून संबोधतात. कुणाला पोटावरचे फॅटस् नको असतात, तर कुणाला लोंबकळणाऱ्या दंडावरचे. इतके च काय जाडजूड दिसणाऱ्या व्यक्तींना इंग्रजीमध्ये ‘फॅट पीपल’ असाच शब्द आहे. मग खरेच फॅटस् खाऊच नयेत का?  फॅटस् म्हणजे मराठीत स्निग्ध पदार्थ आणि ते सरसकट वाईटच असतात, असे आजिबात नाही. उलट स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाच्या भूमिका निभावत असतात. आपला मेंदू ज्या घटकांनी बनतो, त्यामध्ये साठ टक्क्यांहून आधिक वाटा हा स्निग्ध पदार्थांचा असतो. मेंदूपासून निघणाऱ्या नसांचे आवरणही स्निग्ध पदार्थांपासून बनते. ह्रदय आवरणही स्निग्ध पदार्थांपासून बनते. ह्रदय, मूत्रपिंडे, यकृत, फुप्फुसे या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना दुखापत होऊ नये, त्यांचे छोट्या-मोठ्या आघातांपासून संरक्षण व्हावे, यासाठी त्यांच्या भोवताली जे सुरक्षाकवच असते ते स्निग्ध पदार्थच असतात. तसेच काही जीवनसत्त्वांचे शोषण करून घेणे, सांध्याना वंगण पुरविणे, चेहऱ्यावरील तजेला कायम ठेवणे, अशी अनेक कार्य हे पदार्थ करीत असतात. एक ग्रॅम स्निग्ध पदार्थांमधून नऊ किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. जी शरीर वापरतेच; परंतु जास्त राहणारी ऊर्जा स्निग्ध पदार्थांचे आवरण बनवून शरीर त्वचेखाली साठवून ठेवत असते. जेव्हा आपण आजारी पडतो, तेव्हा पोषण मूल्यांची गरज वाढते; परंतु अन्नावरील वासना उडाल्याने जेवण व्यवस्थित खाल्ले जात नाही. अशावेळी लागणारे अतिरिक्त उष्मांक हे शरीरातील स्निग्ध पदार्थांचा साठा वापरून उपलब्ध केले जातात. कधी जेवण वेळेवर मिळाले नाही, उपासमार झाली (जी हल्ली बरेचजण ू१ं२ँ ्िरी३ मुळे करवून घेतात) तर, यावेळी मदतीस धावून येतात ते फक्त स्निग्ध पदार्थ. ज्यामुळे आपण आजारी पडत नाही. गर्भारपणामध्ये पोटातील बाळाची योग्य वाढ होणे, प्रसूतीनंतर पुरेशा दुधाची निर्मिती होणे, शरीराचे तापमान नियंत्रित करणे यासाठी सुद्धा स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते.
तुम्ही म्हणाल फॅटस् खावे तरी पंचाईत, नाही खावे तरी पंचाईत. नक्की करायचे तरी काय? स्निग्ध पदार्थांच्या सेवनाबाबत लोकांच्या मनात खूपच गोंधळ असतो. किती खायचे, काय खायचे, तेल वापरायचे की तूप, कुठले तेल वापरावे, शरीरात असणारे फॅटस् कसे बाहेर निघतात. मी याबद्दल निरनिराळ्या लोकांकडून इतके प्रश्न, इतक्या समजुती, गैरसमजुती ऐकल्या आहेत की, मला वाटते येथून पुढचे सगळे लेखसुद्धा मी फॅटस्वर लिहू शकेन.
पण, हा विषय वाटतो तितका क्लिष्ट नाही. फक्त आपल्याला निवड करता आली पाहिजे. चांगल्या आणि वाईट फॅटस्मधून स्निग्ध पदार्थांचे त्यांच्या संरचनेनुसार वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा रक्ताचा रिपोर्ट पाहिलात, तर त्यामध्ये टोटल कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइटस्, एचडीएल, अशा वेगवेगळ्या घटकांची पातळी लिहिलेली असते. डॉक्टर पेशंटना सल्ला
देतात की, चांगले कोलेस्टेरॉल वाढवा आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी
करा. म्हणजे नक्की काय खायचे आणि काय टाळायचे या विषयावर पुढच्या लेखात.
- डॉ. शिल्पा जाधव - लेखिका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत.

Web Title: Friendship with 'Fats'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.