आता कोल्हापुरातून थेट आसाम, या रेल्वे सेवेमुळे पर्यटनाला मिळणार चालना; 'असे' आहे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 12:36 PM2022-02-12T12:36:12+5:302022-02-12T12:36:47+5:30
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या आणि गुवाहाटी येथील माता कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविक, पर्यटकांची या नव्या रेल्वेमुळे मोठी सोय होणार
कोल्हापूर : कोल्हापुरातून रेल्वेने थेट गुवाहाटी (आसाम) येथे जाता येणार आहे. रेल्वे विभागाकडून दि. १२ एप्रिलपासून कोल्हापूर - गुवाहाटी एक्स्प्रेसची सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
हॉलिडे स्पेशल म्हणून दि. ७ जूनपर्यंत कोल्हापूर - गुवाहाटी एक्स्प्रेसच्या नऊ फेऱ्या होणार आहेत. आठवड्यातील दर मंगळवारी कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी रेल्वे सुटणार आहे. त्यानंतर ती सकाळी सहा वाजता मिरजमधून गुवाहाटीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
ही रेल्वे शुक्रवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. त्यादिवशी सायंकाळी पावणेसहा वाजता निघणारी रेल्वे कोल्हापुरात सोमवारी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे.
दरम्यान, सध्या कोल्हापूर - धनबाद मार्गावर दीक्षाभूमी एक्स्प्रेस धावत आहे. त्याच मार्गाने कोल्हापूर - गुवाहाटी रेल्वे पुढे जाणार आहे. त्यामुळे दीक्षाभूमी एक्स्प्रेसवर असणारा प्रवाशांचा भार कमी होणार असल्याचे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे प्रबंधक विजयकुमार यांनी शुक्रवारी सांगितले.
याठिकाणी असणार थांबे
कोल्हापूर - गुवाहाटी एक्स्प्रेसचे मिरज, लातूर रोड, पिंपळखुटी, जहारपुरा, इटारसी जंक्शन, मणिपूर जंक्शन, प्रयागराज (इलाहाबाद), दीनदयाळ उपाध्याय (मुघल सराई), गया, किऊल जंक्शन, मलदा टाऊन, जलपाईगुडी या स्थानकांवर थांबणार आहे.
कोल्हापूर - कलबुर्गी एक्स्प्रेसही सुरू होणार
कोल्हापूर - कलबुर्गी (कर्नाटक) एक्स्प्रेसही रेल्वे विभागाकडून सुरू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापुरातून पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या आणि गुवाहाटी येथील माता कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविक, पर्यटकांची या नव्या रेल्वेमुळे मोठी सोय होणार आहे. -शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती
कोल्हापूरमधून आणखी एक लांब पल्ल्याची रेल्वे सुरू होत असल्याचा आनंद आहे. कोल्हापूर - गुवाहाटी, कोल्हापूर - कलबुर्गी एक्स्प्रेसमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. -मोहन शेटे, रेल्वे प्रवासी