विद्यापीठ बंद करण्याची सुपारी घेतलीय का?; प्राध्यापक भरतीवरुन कोल्हापुरात युवा सेनेचा हल्लाबोल
By पोपट केशव पवार | Published: December 12, 2023 05:52 PM2023-12-12T17:52:32+5:302023-12-12T17:54:49+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात पूर्वी २१० प्राध्यापक कार्यरत होते. परंतु गेल्या आठ ते दहा वर्षात ही संख्या ९० प्राध्यापकांवर ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात पूर्वी २१० प्राध्यापक कार्यरत होते. परंतु गेल्या आठ ते दहा वर्षात ही संख्या ९० प्राध्यापकांवर आली. काही विभागात एकही प्राध्यापक नाही. तर काही विभागात एकाच प्राध्यापकावर काम सुरु आहे. शासनाने विद्यापीठांना सहाय्यक प्राध्यापक नोकर भरती करण्यासाठी मान्यता दिली. पण, विद्यापीठ प्रशासनाची उदासीनता व कुलगुरुंचे दुर्लक्ष यामुळे प्राध्यापक भरती केलेली नाही. भविष्यात हे विद्यापीठ बंद करण्याची सुपारी प्रशासनाने घेतली आहे का ?असा सवाल करत युवा सेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट मंगळवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात हल्लाबोल आंदोलन केले.
ग्रामीण भागातील नवतरुण विद्यापीठात कायम प्राध्यापक होण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. यातील एक -दोन प्राध्यापकांनी या दिरंगाईला कंटाळून आत्महत्याही केली आहे. परंतु, या प्रशासनाला त्याची चिंता नाही. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. आपली कार्यपद्धती बदलून विद्यापीठाला मोकळा श्वास द्यावा, अन्यथा येणाऱ्या काही दिवसात युवासेना अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फसल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा देण्यात आला.कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी विद्यापीठातील प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले.
युवा सेना जिल्हा युवा अधिकारी मंजीत माने, योगेंद्र माने, प्रदीप हांडे, फिरोज मुलानी, शेखर बारटक्के,सानिका दामूगडे माधुरी जाधव, प्रिया माने, अक्षय घाडगे, रघु भावे उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात राजकारण नको
युजीसीच्या सूचनेनुसार पंतप्रधानांचा फोटो असलेला सेल्फी पॉईंट प्रत्येक महाविद्यालयाच्या बाहेर लावण्याची जाहीर केले आहे. हा प्रकार शिक्षण क्षेत्रात राजकारण घुसडल्या सारखा आहे, या निर्णयावर आपण काय भूमिका घेतली आहे असा सवाल युवा सेनेने केला.