आजपासून बारावीची परीक्षा, भरारी पथकांची राहणार नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 11:25 AM2022-03-04T11:25:49+5:302022-03-04T11:31:40+5:30
कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी बारावीची परीक्षा ऑफलाईन स्वरूपात
कोल्हापूर : कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी बारावीची परीक्षा ऑफलाईन स्वरूपात होणार आहे. या परीक्षेची सुरुवात आज, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता इंग्रजी विषयाच्या पेपरने होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २९१ केंद्रांवर एकूण ५२,८२२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने परीक्षा तयारी पूर्ण केली आहे. यावर्षी महाविद्यालय तेथे परीक्षा केंद्र असणार आहे. विद्यार्थी संख्या अधिक असलेल्या महाविद्यालयांत पर्यवेक्षक जादा लागणार आहेत. त्यादृष्टीने गेल्या दोन दिवसांपासून महाविद्यालयांची तयारी सुरू आहे. समुपदेशक नियुक्ती, हेल्पलाईनची सुविधा, उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचविणे, आदी स्वरूपातील तयारी शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने पूर्ण केली असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष सत्यवान सोनवणे यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी किमान एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आणि मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, परीक्षा कक्षांची स्वच्छता, सॅनिटायझेशन आणि बेंचवर बैठक क्रमांक नोंदविण्याचे काम महाविद्यालयांत गुरुवारी करण्यात आले. आवश्यक सूचना महाविद्यालयांनी नोटीस फलकावर लावल्या आहेत. त्याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने अभ्यासाची उजळणी करण्यात विद्यार्थी मग्न झाले होते.
सात भरारी पथकांची राहणार नजर
परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून सात भरारी पथके कार्यान्वित असणार आहेत. कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या दक्षता समितीच्या बैठकीतील सूचनांनुसार कार्यवाही करण्याबाबत शिक्षण विभागाने महाविद्यालयांना कळविले आहे. त्यात तालुकास्तरीय बैठे पथकातील कर्मचारी ज्या गावात कार्यरत अथवा रहिवासी आहेत. त्यांची त्यांच्या गावात नियुक्ती करण्यात येऊ नये. पर्यवेक्षकांच्या नेमणुका त्यांच्या शाळा, महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रावर न करता साखळी पद्धतीने नजीकच्या केंद्रावर करावी, आदी सूचनांचा समावेश आहे.