अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
By admin | Published: November 1, 2015 12:42 AM2015-11-01T00:42:01+5:302015-11-01T00:57:59+5:30
प्रलंबित मानधनाची मागणी : दोन दिवसांत जमा होणार - प्रशासन
कोल्हापूर : तीन महिन्यांचे प्रलंबित मानधन मिळावे, निवडणुकीतील कामे लावू नका, आदी मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. बहुतांश तालुक्यातील तीन महिन्यांचे मानधन जमा झाले आहे, तांत्रिक अडचणीमुळे राहिलेले मानधन येत्या दोन दिवसांत सेविका व मदतनीस यांच्या खात्यावर जमा केले जाईल, असे आश्वासन महिला, बालकल्याण विभागाच्यावतीने मोर्चेकऱ्यांना देण्यात आले.
जुलैपासूनचे मानधन मिळावे, सेविका व मदतनिसांना सेवा समाप्तीनंतर द्यावयाच्या पेन्शनबाबत पूर्वलक्षी प्रभावाने २००८ पासून मिळाली पाहिजे, त्याची अंमलबजावणी करा. खासगी शाळांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे अंगणवाडीमध्ये येणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली आहे. याबाबत शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी व अशा प्रकारच्या खासगी बालवाड्या बंद करण्याबाबत आदेश द्यावेत, किमान वेतन कायदा लागू करा, केंद्र शासनाने मानधनात दुप्पट वाढ करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, नियमबाह्य कामाची सक्ती करू नये, मतदार पुनर्नोंदणीकामी ‘बीएलओ’ या कामासाठी अंगणवाडी सेविकांना सक्ती केली जाते ती तत्काळ थांबवावी, यावर्षीची भाऊबीज लगेच मिळावी, आदी मागण्यांसाठी युनियनचे प्रमुख आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. ‘कोण म्हणते देत नाही..., मानधन आमच्या हक्काचे ....., यांसह राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी सेविका व मदतनीस यांनी परिसर दणाणून सोडला. आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांना निवेदन दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत सप्टेंबरअखेरचे मानधन अदा केलेले आहे, काही ठिकाणी तांत्रिक कारणामुळे प्रलंबित असलेले मानधन येत्या दोन दिवसांत खात्यावर जमा होईल. गत दिवाळीची भाऊबीजही संबंधितांच्या खात्यावर जमा झाल्याचे महिला, बालकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी जयश्री पाटील, सरिता कंदले, अर्चना पाटील, शोभा भंडारे, आरती लाटकर, शमा पठाण, आदी उपस्थित होते.