झारखंड येथील सामूहिक अत्याचाराच्या निषेधार्थ ‘वंचित’चा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 05:03 PM2019-07-08T17:03:24+5:302019-07-08T17:04:45+5:30
झारखंड राज्यात चोरीच्या आरोपावरून तरबेज अन्सारी ऊर्फ सोनू याला एका समूहाच्या लोकांनी खांबाला बांधून रात्रभर मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. यातील आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी वंचिन बहुजन आघाडी व ‘एमआयएम’तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर : झारखंड राज्यात चोरीच्या आरोपावरून तरबेज अन्सारी ऊर्फ सोनू याला एका समूहाच्या लोकांनी खांबाला बांधून रात्रभर मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. यातील आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी वंचिन बहुजन आघाडी व ‘एमआयएम’तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
दुपारी साडेबाराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. ‘वंचित’ व ‘एमआयएम’चे झेंडे घेतलेले कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी काही काळ जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.
मोर्चा मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निदर्शने झाल्यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, झारखंड येथील तबरेज अन्सारी याला एका समूहाच्या लोकांनी खांबाला बांधून घालून रात्रभर मारहाण केली. त्यानंतर त्याला अर्धमेल्या अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनीही त्याला मारहाण केली. यानंतर गंंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
देशात सध्या अशा घटनाबाह्य गोष्टी आणि धर्मांध शक्तींचा वाढता उद्रेक याचा वंचित बहुजन आघाडी निषेध करत आहे. देशात मुस्लिमांना तसेच दलितांवर गाईच्या नावावर तसेच एका धार्मिक नाऱ्यासाठी मुस्लिम समूदायावर बीफ खाल्ल्याचा व चोरीचा मुद्दा घेऊन मारहाण केली जाते. अशा कट्टर धर्मांध लोकांमुळे भारतीय लोकशाही व एकता विविधतेतून एकात्मता धोक्यात आलेली आहे.
आंदोलनात ‘वंचित’चे जिल्हाध्यक्ष अस्लम मुल्ला, उत्तम वाघवेकर, दिगंबर सकट, प्रेमकुमार माने, सुशीलकुमार कोल्हटकर, अस्मिता दिघे, ‘एमआयएम’चे इम्रान सनदी, शाहिद शेख, युवराज शिंदे, कादर मलबारी, सचिन अडसुळे आदींचा समावेश होता.