जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाने ‘गोंधळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 06:21 PM2019-01-28T18:21:19+5:302019-01-28T18:23:29+5:30
कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळाच्यावतीने सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढत शासनाला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आई-दादा उदं-उदं बोला’ अशा सुरात संभाळ वाद्यांसह गोंधळ घातला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळाच्यावतीने सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढत शासनाला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आई-दादा उदं-उदं बोला’ अशा सुरात संभाळ वाद्यांसह गोंधळ घातला.
शासनाने मागण्या मान्य न केल्यास भविष्यात राज्यभरातून मंत्रालयावर मोर्चा काढण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. समाज मंडळाचे अध्यक्ष व इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोजणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मोर्चाला शिवसेनेच्या जिल्ह्यातील आमदार व नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.
मोर्चाला दसरा चौकातून प्रारंभ झाला. मोर्चा व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चामध्ये गोंधळी समाजाच्यावतीने शासनाला जाग आणण्यासाठी संभाळ वाद्यासह ‘उदं गं अंबे’चा गजर संपूर्ण मार्गावर केला. गोंधळी वाद्याच्या तालावर नाचत सहभागी झाले होते. मोर्चात प्रत्येकजण डोक्यावर ‘आम्ही गोंधळी’ लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान करून, खांद्यावर भगवे, लाल-पिवळे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. अनेकांच्या हातात मागण्यांचे फलक झळकत होते.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर तेथे समाज मंडळाचे अध्यक्ष सुभाष भोजणे यांनी, समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी एकजुटीने सज्ज रहा, असे आवाहन केले. कार्याध्यक्ष बबन कावडे यांनीही, सरकारवर टीका करीत मागण्या मान्य करण्यासाठी प्रसंगी पायातील हातात घेण्याची वेळ सरकारने आणू नये, असाही इशारा दिला.
आमदार सुजित मिणचेकर यांनी, समाजाच्या मागण्यांबाबत शिवसेनेचे सर्व आमदार, नेते तुमच्या पाठीशी असून, अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून आवाज उठविण्याची ग्वाही दिली. आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैयशील माने हेही मोर्चात सहभागी झाले होते. शिष्ठमंडळाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले.
मोर्चात, अध्यक्ष सुभाष भोजणे, कार्याध्यक्ष बबन कावडे, अभिजित गजगेश्वर, बाळासाहेब काळे, महेश भिसे, विजय काळे, परिवहन सभापती राहुल चव्हाण, नगरसेवक दिलीप पवार, इचलकरंजीच्या नगरसेविका लक्ष्मीबाई धातुंडे, उदय धातुंडे, रत्नाकर विटेकरी, बाळासाहेब धुमाळ, शंकर धातुंडे, सदाशिव सरवदे, अभिजित भिसे, कल्पना जोशी, आदी सहभागी झाले होते.
डोक्यावर भांडी, पिंजऱ्यात पोपट
जोशी समाजाचा फिरून भांडी विक्रीचा व्यवसाय असल्याने मोर्चात डोक्यावर बुट्टीत भांडी घेऊन अनेक महिला सहभागी झाल्या होत्या, तर पोपटांचे पिंजरे डोक्यावर घेऊन पुरुष मोर्चात सहभागी झाले होते.
पारंपरिक वेशात गोंधळी, वासुदेव
मोर्चात गोंधळी समाजाचे कार्यकर्ते गळ्यात कवड्यांची माळ, डोक्यावर पगडी, अंगात लाल झब्बा, अशा गणवेशात संभाळ वाद्य वाजवत सहभागी झाले होते. वासुदेव समाजाचे कार्यकर्ते डोक्यावर मोरपिसांची पगडी, हातात लटकणारी टाळ वाजवत, पांढऱ्या गणवेशात सहभागी झाले होते.
मागण्या
- भारत सरकार नियुक्त व दादा इदाते आयोग समितीची शिफारशी लागू करा.
- गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजाची जातनिहाय जनगणना करावी.
- एससी, एसटीच्या धर्तीवर भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र तिसरी सूची कायमस्वरूपी आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा.
- जातीच्या दाखल्यासाठी १९६१ पूर्वी दाखल्याची अट रद्द करून शासन जीआर २००८ प्रमाणे पुनर्जिवित करावे.
- शासकीय गायरानच्या जमिनी गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजासाठी घरकुल योजनेला द्याव्यात.
- गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजाला २.५ टक्के आरक्षण असून, ते आता जनगणनेच्या प्रमाणात वाढवून मिळावे.
- भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी क्रिमिलर अट सरसकट रद्द करावी.