नव्या मुख्य न्यायाधीशांसमोर सर्किट बेंचबाबत बाजू मांडू
By admin | Published: September 10, 2015 01:27 AM2015-09-10T01:27:40+5:302015-09-10T01:27:40+5:30
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश जेव्हा नियुक्त होतील, तेव्हा त्यांच्यासमोर राज्य सरकारतर्फे कोल्हापूरच्या सर्किट बेंचच्या मागणीबाबत बाजू मांडली जाईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव करून तो मुख्य न्यायाधीशांकडे पाठविला होता. तसेच एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची ग्वाहीही ठरावात दिली होती. त्यामुळे राज्य सरकारने कोल्हापूरकरांना दिलेल्या ‘शब्दा’प्रमाणे आपली भूमिका पार पाडली आहे; परंतु मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी सर्व न्यायाधीशांसमोर हा विषय ठेवला होता. कोल्हापूरला सर्किट बेंचची आवश्यकता नाही, असे त्यांचे मत आहे. सरकार आता नवीन मुख्य न्यायाधीश जेव्हा नियुक्त होतील, तेव्हा ही मागणी पुन्हा त्यांच्यासमोर मांडेल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
कोल्हापूरला सर्किट बेंच व्हावे ही सरकारची स्पष्ट भूमिका असून ती पार पाडलेली आहे. यापुढेही ती पार पाडली जाईल. कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा निर्णय झाला तेव्हा पुणे, अमरावती शहराचीही मागणी पुढे आली होती; परंतु मंत्रिमंडळ बैठकीत कोल्हापूरसाठीचा ठराव केला, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)