हुपरीत जनवादी महिला संघटनेचा मोर्चा
By admin | Published: August 11, 2015 12:51 AM2015-08-11T00:51:12+5:302015-08-11T00:51:12+5:30
तलाठी कार्यालयावर मोर्चा : शासकीय अनुदान योजना, रेशन वितरण प्रस्ताव दिरंगाई
हुपरी : संजय गांधी, इंदिरा गांधी तसेच श्रावणबाळ या शासकीय अनुदान योजना व रेशन वितरण प्रस्तावाबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबतचा जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हुपरी (ता. हातकणंगले) येथील मंडल अधिकारी व गावकामगार तलाठी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, याप्रश्नी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी तहसीलदार दीपक शिंदे उद्या, मंगळवारी सकाळी हुपरीतील मंडल अधिकारी कार्यालयात येणार आहेत. त्यांच्याशी करण्यात येणाऱ्या चर्चेमध्ये जर योग्य तोडगा न निघाल्यास शुक्रवारी, दि. १४ आॅगस्टला उपोषण करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. मागण्यांचे निवेदन मंडल अधिकारी के. एस. कोळी यांना देण्यात आले.संजय गांधी, इंदिरा गांधी, विधवा, निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्तिवेतन योजना, आदी शासकीय योजनेतील हुपरी परिसरातील पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती गेल्या सहा महिन्यांपासून मिळणे बंद झाले आहे. तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना गेल्या आठ महिन्यांपासून धान्य मिळालेले नाही. अशा पद्धतीची कार्यवाही करीत असताना लाभार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अनुदान व निवृत्तिवेतनाचा लाभ पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे दिला जात आहे. मात्र, हातकणंगले तालुक्यामध्येच या योजनांचा लाभ मिळणे बंद झाले आहे. याबाबतची माहितीही दिली जात नाही. याचा जाब विचारण्यासाठी येथील मंडल अधिकारी व गावकामगार तलाठी कार्यालयावर सोमवारी लाभार्थ्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. माळभागावरील नवीन बसस्थानकापासून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा मंडल अधिकारी कार्यालयावर आला. तेथे घोषणा देत धरणे आंदोलन करण्यात आले. मोर्चाच्या शिष्टमंडळामध्ये सहभागी असणाऱ्या राजेंद्र शिंदे, रावसाहेब घोरपडे, अनिलकुमार जंगले, विकास पाटील, मुमताज हैदर, सुशीला हातगिणे, आप्पासो कुंभार, चंद्रकांत मगदूम, जयवंती हेरवाडे, फातिमा कवठेकर, आदींनी मंडल अधिकारी के. एस. कोळी व गावकामगार तलाठी नितीन कांबळे यांच्याशी मागण्याप्रश्नी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांशी मागणीबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी तहसीलदार दीपक शिंदे स्वत: येऊन मार्ग काढतील, अशी माहिती यावेळी मंडल अधिकारी कोळी यांनी शिष्टमंडळाला दिली. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.