प्रांत कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: September 11, 2014 09:58 PM2014-09-11T21:58:39+5:302014-09-11T23:17:11+5:30
लाभार्थ्यांचे आंदोलन : विविध मागण्यांसाठी दिवसभर ठिय्या आंदोलन
इचलकरंजी : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ६०० रुपयांवरून मासिक तीन हजार रुपये अनुदान मिळावे, गरीब-श्रीमंत भेदभाव न करता ६५ वर्षांवरील नागरिकांना याचा लाभ द्यावा, लाभार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या तहसीलदार, नायब तहसीलदार, सर्कल, तलाठी यांची चौकशी होऊन त्यांना बडतर्फ करावे, आदी मागण्यांसंदर्भात तालुक्यातील लाभार्थ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
दरम्यान, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे या कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सायंकाळपर्यंत ठिय्या मारला. त्यानंतरही प्रांताधिकारी न आल्याने आंदोलकांनी शिवाजी पुतळा चौकात जाऊन रास्ता रोको केला. त्यामुळे वाहनधारकांसह पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना पुन्हा प्रांत कार्यालयात आणले. त्याठिकाणी निवेदन देऊन ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. प्रांताधिकारी आल्यानंतर त्यांनी निवेदन स्वीकारले व यासंदर्भातील काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी, कोरोची, तारदाळ, खोतवाडी, चंदूर, साजणी, पट्टणकोडोली, अतिग्रे, हेरले, रुकडी, आदी गावांतील वृद्ध, अंध, अपंग, निराधार आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. शिवाजी पुतळ्यापासून निघालेला मोर्चा गांधी पुतळा, कॉँग्रेस समितीमार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर आला. या मोर्चामध्ये मोहन यादव, बापूसाहेब मोरे, गंगुबाई सुतार, सूर्यकांत कांबळे यांच्यासह महिला, वृद्ध, निराधार सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)