उपनगराध्यक्ष निवडीसाठी मोर्चेबांधणी
By admin | Published: December 22, 2016 11:50 PM2016-12-22T23:50:05+5:302016-12-22T23:50:05+5:30
जयसिंगपूर नगरपालिका : शाहू आघाडीकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळणार की, जुन्या जाणत्या सदस्याची निवड करणार याची उत्सुकता
जयसिंगपूर : नगरसेवकांतून उपनगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाल्यामुळे जयसिंगपूर पालिका उपनगराध्यक्ष निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. ताराराणी आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक निश्चित झाला असून, शाहू आघाडीकडून स्वीकृत नगरसेवकपदी यड्रावकर की, सा. रे. पाटील गटाच्या कार्यकर्त्याला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. उपनगराध्यक्षपदी शाहू आघाडीकडून नव्या चेहऱ्याला संधी देणार की, जुन्या जाणत्या सदस्याची निवड करणार याबाबतही उत्सुकता आहे.
उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी १७ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रम जाहीर केला होता; पण १६ डिसेंबरला या निवडीसाठी बोलाविलेल्या बैठका रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. हा आदेश देत असतानाच नगराध्यक्षांना अधिकार वाढविण्यात आले होते. मात्र, उपनगराध्यक्ष निवड नेमकी कशी होणार याबाबत संभ्रमावस्था होती. बुधवारी (दि. २१) शासनाने नगराध्यक्षांना बैठक बोलाविण्याचे अधिकार देण्याबाबत उपनगराध्यक्ष निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकारही देण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. त्यामुळे जयसिंगपूर नगरपालिकेत उपनगराध्यक्ष निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.
पालिकेत राजर्षी शाहू विकास आघाडीचे १३ सदस्य संख्या आहे, तर ताराराणी आघाडीकडे नगराध्यक्ष पदासह नऊ सदस्य संख्या आहे. दोन सदस्य अपक्ष आहेत. दोन्ही आघाड्यांकडून प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य निवडला जाणार आहे. ताराराणी आघाडीने स्वीकृत सदस्य पदासाठी माजी उपनगराध्यक्ष शीतल गतारे यांचे नाव निश्चित केले आहे. १३ सदस्य असल्याने शाहू आघाडीकडे बहुमत आहे.
उपनगराध्यक्ष निवडीसाठी नव्या नगरसेवकांची बैठक बोलाविण्याचे अधिकार नगराध्यक्षांना देण्यात आले आहेत. यामुळे पालिकेतील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. येत्या २६ डिसेंबरला या निवडी होण्याची शक्यता आहे. एकूणच उपनगराध्यक्ष निवडीवरून पालिकेतील राजकीय वातावरण तापत आहे. (प्रतिनिधी)
उपनगराध्यक्षासाठी तर्कवितर्क
अपक्ष दोन सदस्य आपल्याच आघाडीचे असल्याचे ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी नुकतेच जाहीर केले आहे. यामुळे ताराराणी आघाडीकडे स्वीकृतसह १२ सदस्य, तर शाहू आघाडीकडे स्वीकृतसह १४ सदस्य होणार आहेत. उपनगराध्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्षांनाही मतदानाचा अधिकार शासनाने दिल्यामुळे ताराराणी आघाडीकडे १३ सदस्य संख्या होणार आहे. राजकीय चमत्कार घडला तर नेमका उपनगराध्यक्ष कोणत्या आघाडीचा होणार याबाबतही तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.