‘न्यूट्रियंट्स’च्या साखर विक्रीतून एफआरपी -: १५ जुलैला जाहीर लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:40 AM2019-07-05T00:40:57+5:302019-07-05T00:41:33+5:30
‘न्यूट्रियंट्स’ची ४३ हजार ९२२ क्विंटल तारण साखरेची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपी भागवण्याचा निर्णय जिल्हा बँक व अथर्व कंपनीने घेतला आहे. या साखरेचा
कोल्हापूर : ‘न्यूट्रियंट्स’ची ४३ हजार ९२२ क्विंटल तारण साखरेची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपी भागवण्याचा निर्णय जिल्हा बँक व अथर्व कंपनीने घेतला आहे. या साखरेचा जाहीर लिलाव १५ जुलैला जिल्हा बँकेच्या मुख्यालयातच दुपारी एक वाजता होणार आहे. तशी जाहीर नोटीस गुरुवारी जिल्हा बँकेने प्रसिद्धीस दिली आहे.
जिल्हा बँकेने थकीत कर्जापोटी हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखाना न्यूट्रियंट्स कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला होता. कंपनीने २०१६-१७ या गळीत हंगामात १ लाख ४० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. ही तयार झालेली साखर जिल्हा बँकेकडे तारण ठेवून कंपनीने कर्ज उचलले होते. या कर्जातूनच शेतकऱ्यांची एफआरपी भागविण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, पुढील एफआरपी भागविण्यास कंपनीने असमर्थता दर्शवल्याने न्यूट्रियंट्सचा जिल्हा बँकेसोबतचा भाडेकरार संपुष्टात आला होता.
यानंतर नव्याने भाडेतत्त्वाची निविदा प्रक्रिया राबवून अथर्व इंटरट्रेड कंपनीला हा कारखाना चालविण्यास देण्यात आला. यावेळी बँक आणि कंपनीने एकत्रितपणे ही ‘एफआरपी’ची रक्कम अदा करावी, असे ठरले होते. त्यानुसार कंपनी व बँक यांनी संयुक्तपणे प्रादेशिक साखर सहसंचालक, चंदगड तहसीलदार आणि शेवटी जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकºयांची यादी मागणी केली होती. तथापि आजअखेर ही यादी मिळालेली नाही; पण शेतकºयांची होणारी आर्थिक अडचण ओळखून बँकेने कर्जापोटी तारण असलेली साखर विक्री करून एफआरपी भागविण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकसान होण्यापेक्षा शेतकºयांना फायदा
तारण म्हणून असलेली साखर ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू असल्याने ती भिजून नुकसान होण्यापेक्षा ती विकली तर शेतकºयांना तरी तिचा लाभ होईल, असा विचार जिल्हा बँकेने केला आहे. म्हणून साखर विक्री जाहीर लिलावाद्वारे काढण्याची नोटीस काढल्याची माहिती जिल्हा बॅँकेने कळवली आहे.