एफआरपी, दुष्काळावरून राजू शेट्टींचे आंदोलनास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:47 AM2019-05-01T00:47:19+5:302019-05-01T00:47:24+5:30
कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातील आभार दौरे आटोपल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आंदोलनास्त्र उपसण्याची तयारी केली ...
कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातील आभार दौरे आटोपल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आंदोलनास्त्र उपसण्याची तयारी केली आहे. येत्या सोमवारी (दि. ६ मे) थकीत एफआरपीवरून साखर आयुक्तांना, तर दुष्काळावरून विभागीय आयुक्तांना जाब विचारला जाणार आहे. त्यानंतर बुधवार (दि. ८ मे) पासून प्रचारासाठी उत्तर भारतातील राज्यामध्ये उतरणार आहेत. विशेष म्हणजे वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार सभा घेण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे हातकणंगले मतदारसंघातून सलग दोनवेळा खासदार झाले आहेत. आता तिसऱ्यांदा संसदेत जाण्यासाठी ते नुकतेच मतदानाला सामोरे गेले आहेत. मतदान झाल्याच्या दुसºया दिवसापासून (२४ एप्रिल) त्यांनी मतदारसंघातून आभार दौरे सुरू केले आहेत. मतदारसंघांतर्गत येणारे शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, वाळवा, शिराळा, शाहूवाडी, आष्टा, इस्लामपूर या तालुक्यांचे दौरे आज पूर्ण झाले. हे दौरे पूर्ण करून त्यांनी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे.
थकीत एफआरपीच्या बाबतीत निवडणुकीआधी ‘स्वाभिमानी’ने आंदोलन केले होते, त्यावेळी ८0 टक्के तरी रक्कम पदरात पाडून घेतली होती. आता उरलेली एफआरपी का दिली नाही, कारखान्यांवर का कारवाई नाही, साखर जप्तीच्या बाबतीत काय झाले, यासंदर्भात सोमवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना जाब विचारला जाणार आहे. कारवाईचे पत्र घेऊनच कार्यालयातून बाहेर पडणार आहे.
एफआरपीबरोबरच दुष्काळाचा विषय अग्रक्रमाने घेतला जाणार आहे. सध्या दुष्काळाने निम्म्याहून अधिक महाराष्ट्र होरपळत आहे. निवडणूक काळात आचारसंहितेचे कारण सांगून सरकारने व प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आता निवडणुका विसरा आणि दुष्काळात होरपळणाºया जिवांना दिलासा द्या या मागणीसाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांना सोमवारीच जाब विचारला जाणार आहे. ठोस उपाययोजना न केल्यास रस्त्यावरची लढाई सुरू करण्याचा इशाराही दिला जाणार आहे.
उत्तर भारतात प्रचार करणार
हातकणंगलेतून निवडणूक लढवलेल्या शेट्टी यांच्या प्रचारासाठी योगेंद्र यादवासह देशभरातील शेतकरी नेते आले. आता लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या तीन टप्प्यांत स्वत: शेट्टी उत्तर भारतात प्रचारासाठी जाणार आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेशात सभांचे नियोजन आहे.
भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर देणार
मी हातकणंगलेतून एक हजार एक टक्के विजयी होणार आहे. माझा लोकांवर आणि लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. भाजपने मात्र खालच्या पातळीवर जाऊन माझ्याविरोधात प्रचार केला, आरोप केले, आता पुढील पाच वर्षे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तरे देत राहणार आहे.