पूजा भोसले, भरत गाठसह तिघांकडून २२ लाखांना गंडा; ‘निवारा ट्रस्ट’विरोधात गुन्हा

By विश्वास पाटील | Published: May 4, 2023 06:46 AM2023-05-04T06:46:50+5:302023-05-04T06:47:14+5:30

पोलिसांकडून मात्र कारवाईसाठी टाळाटाळ, फसवणुकीचा कहर म्हणजे या मेळाव्यास ‘सेबी’चे सदस्य, पुण्याचे धर्मादाय आयुक्त, पुण्याचे जिल्हा न्यायाधीश, पुण्याचे आयकर आयुक्त आणि लता प्रसाद या उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे

Fruad of 22 lakhs from three including Pooja Bhosale, Bharat Gath; Crime against Nivara Trust | पूजा भोसले, भरत गाठसह तिघांकडून २२ लाखांना गंडा; ‘निवारा ट्रस्ट’विरोधात गुन्हा

पूजा भोसले, भरत गाठसह तिघांकडून २२ लाखांना गंडा; ‘निवारा ट्रस्ट’विरोधात गुन्हा

googlenewsNext

कोल्हापूर - सहा हजार रुपये भरल्यावर तुमच्या नावे चक्क २५ लाखांची एफडी (फिक्स डिपॉझिट) करण्याचे आमिष दाखवून पुणे, कोल्हापुरात कार्यालये असलेल्या ‘निवारा टेस्टामेंटरी ट्रस्ट अँड एनजीओ’ने ४३२ लोकांकडून नोंदणी शुल्काच्या नावाखाली २२ लाख ३७ हजार रुपये उकळले असून, वारंवार मागणी करूनही ही रक्कम परत देत नसल्याबद्दल येथील शाहुपुरी पोलिसांत तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

पूजा अजित भोसले-जोशी (रा. सिल्व्हर आर्च अपार्टमेंट, राजारामपुरी, ३ री गल्ली, कोल्हापूर), राहुल रमेश भोसले (रा. पूजाप्रिया पार्क, उचगाव, ता. करवीर) व भरत गाठ (रा. शरद इन्स्टिट्यूटजवळ, यड्राव रोड, इचलकरंजी) अशी फसवणूक केलेल्या संशयितांची नावे आहेत. फसवणुकीचा गुन्हा २४ एप्रिलला दाखल होऊनही पोलिसांना त्यांना अजून अटक करण्याची सवड झालेली नाही. याप्रकरणी सचिन लालासो देसाई (रा. तक्षक अपार्टमेंट, नागाळा पार्क, कोल्हापूर) व नामदेव बाबासाहेब जाधव (रा. विक्रमनगर, कोल्हापूर) यांनी तक्रार दिली. भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२०,४६८,४७१, ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधींचे संरक्षण) अधिनियम १९९९ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा गुन्हा रजिस्टर क्रमांक ०४८८ असा आहे.

तक्रारदार देसाई हे सिव्हील इंजिनिअर असून, ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची भविष्य निर्वाह सल्लागार म्हणून राहुल भोसले याची ओळख झाली. त्यांनी या ट्रस्टबद्दल माहिती दिली. म्हणून त्यांनी स्वत:च्या कुटुंबीयांसह ओळखीच्या लोकांना सांगून २७० लोकांकडून ३९०० रुपये ट्रस्टसाठी व ६०० रुपये कागदपत्रांच्या खर्चासाठी असे प्रत्येकी ४५०० रुपयांप्रमाणे ७ लाख ६९ हजार रुपये गुगल पे व रोखीने भरले. शिवाय आठ दिवसांत परत करण्याच्या अटीवर २ लाख ६५ हजार दिले. फिर्यादी जाधव यांनीही याचप्रमाणे २७० लोकांचे १२ लाख ३ हजार रुपये भरले आहेत. 

महासैनिक दरबार हॉलमध्ये उद्या मेळावा...

या ‘निवारा टेस्टामेंटरी ट्रस्ट अँज एनजीओ’तर्फे कोल्हापूर आणि पुणे येथील गुंतवणूकदारांचा वार्षिक मेळावा उद्या शुक्रवारी ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता येथील कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉलमध्ये बोलाविला आहे. फसवणुकीचा कहर म्हणजे या मेळाव्यास ‘सेबी’चे सदस्य, पुण्याचे धर्मादाय आयुक्त, पुण्याचे जिल्हा न्यायाधीश, पुण्याचे आयकर आयुक्त आणि लता प्रसाद या उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे. लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून न्यायालय व अन्य सरकारी यंत्रणांचाही वापर केला आहे.

‘लोकमत’ने केला होता पर्दाफाश

या ट्रस्टतर्फे येथील बिनखांबी गणेश मंदिर परिसरात कार्यालय उघडून लोकांकडून प्रत्येकी सहा हजार रुपये भरून घेण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १३ नोव्हेंबर २०२२ ला दिले होते. त्याचा पाठपुरावाही केला; परंतु तक्रार देण्यास कोण पुढे आले नव्हते; परंतु आता त्याविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंद झाल्याने त्या फसवणुकीवर शिक्कामोर्तब झाले.

धर्मगुरूंची मध्यस्थी

सचिन देसाई यांनी पोलिसांत तक्रार दिल्यावर संशयित आरोपींवर कारवाई झालेली नाही; परंतु असा गुन्हा दाखल झालेली माहिती संशयित पूजा भोसले व इतरांना मिळाली. त्यांनी शिरोळ तालुक्यातील एका धर्मगुरुस मध्यस्थी घालून माझ्यावर दबाव आणत असल्याची तक्रार देसाई यांनी बुधवारी थेट पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली. उद्या होणाऱ्या मेळाव्याची निमंत्रण पत्रिकाही त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिली आहे. तिथे आपण संशयित आरोपींची चौकशी करू शकतात, असे त्यात म्हटले आहे.

Web Title: Fruad of 22 lakhs from three including Pooja Bhosale, Bharat Gath; Crime against Nivara Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.