काटकसरीला उत्पादक, उधळपट्टीला संचालक ‘गोकुळ’चा कारभार : कोचीमधील परिषदेसाठी लाखोंचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:43 AM2018-02-11T00:43:04+5:302018-02-11T00:46:39+5:30
कोल्हापूर : गाईच्या दुधात तोटा होतो म्हणून खरेदीदरात कपात करणाºया ‘गोकुळ’च्या संचालकांची उधळपट्टी थांबत नाही. इंडियन डेअरी असो.च्या कोची येथे सुरू असलेल्या परिषदेसाठी लाखोंची उधळपट्टी केल्याचे पुढे आले असून, ‘काटकसरीला दूध उत्पादक आणि उधळपट्टीला संचालक’ अशीच अवस्था संघाची झाल्याची चर्चा सुरू आहे.
‘गोकुळ’मधील उधळपट्टी व संचालकांचा मनमानी कारभार नवीन नाही. आपल्या कारभाराचा सर्वसाधारण सभेत पंचनामा होणार म्हटल्यावर हुकुमशाहीवृत्तीने सभा गुंडाळली. त्याविरोधात विरोधकांनी आक्रमकपणे संचालकांचे वाभाडे काढले. सभा वैध की अवैध, हा निर्णय आता न्यायालयात होईल. त्यानंतर अतिरिक्त दुधाच्या नावाखाली गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात करून उत्पादकांना झटका दिला. एकीकडे पशुखाद्याचे दर भडकले असताना दुसºया बाजूला खरेदी दर कमी करून उत्पादकांचे कंबरडे मोडले. गाईचे दूध कसे तोट्याचे आहे, याची आकडेवारी संघातील तज्ज्ञ अगदी पोटतिडकीने सांगतात; पण त्यांना उत्पादकांची अडचण दिसत नाही.
गेली दहा-पंधरा वर्षे मोठ्या कष्टाने उभा केलेला गाईचा गोठा मोडा, असे अप्रत्यक्ष वक्तव्य संचालकांकडून केले जाते. पावडरीचे दर घसरल्याने गाईच्या दुधात थोडा तोटा होतही असेल; पण सगळाच तोटा उत्पादकांच्या माथी का मारता? काटकसरीचा कारभार करून हा तोटा संघाने सहन करणे गरजेचे होते. काटकसरीचा कारभार आणि एकूण उत्पन्नातील ८१ टक्के परतावा, या गोष्टी संचालक सांगतात; पण वस्तुस्थिती वेगळी आहे. दूध संस्थांच्या गाठीभेटीसाठी खरेदी केलेल्या ‘स्कॉर्पिओ’ गाड्या पुणे, मुंबईसह इतर राज्यांच्या दौºयांवरच अधिक असतात. मध्यंतरी संचालक, अधिकाºयांचे गोव्यात प्रशिक्षण शिबिर ठेवले होते. त्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप विरोधकांनी केला.
सध्या कोची (केरळ)मध्ये इंडियन डेअरी असो.ची परिषद होत आहे. वास्तविक संलग्न संस्था म्हणून अध्यक्ष व फार तर कार्यकारी संचालक तिथे जाणे संयुक्तिक आहे; पण डझनापेक्षा अधिक संचालक, कार्यकारी संचालक, अधिकारी व काही मर्जीतील कर्मचारीही तिथे गेले आहेत. काहीजण विमानातून तर काहीजण ‘गोकुळ’च्या स्कॉर्पिओमधून गेले आहेत. यासाठी सुमारे ३५ लाख रु. खर्च केल्याची चर्चा सध्या सुरू आहे
गरज सरो, वैद्य मरो!
‘गोकुळ’ला ज्यावेळी दुधाची गरज होती, त्यावेळी उत्पादकांना गाय खरेदीसाठी प्रोत्साहन दिले. म्हशीच्या तुलनेत गाईच्या संगोपनातून चार पैसे चांगले मिळतात म्हणून शेतकºयांचा ओढा गाईकडे वाढला. परिणामी दुधात वाढ झाली. आता हे दूध संघाला नको आहे; त्यामुळे दूध नाकारण्याची भाषा सुरू झाली. ‘गोकुळ’ची ही भूमिका म्हणजे ‘गरज सरो, वैद्य मरो’ अशी असल्याची उत्पादकांची भावना आहे. .