बाजार समितीत भाजीपाल्यानंतरच फळांचे सौदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 12:36 PM2021-04-17T12:36:37+5:302021-04-17T12:38:49+5:30
CoronaVIrus FruitsMarket Kolhapur : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नवीन नियमावली तयार केली आहे. त्यानुसार भाजीपाल्याचे सौदे झाल्यानंतरच फळांचे सौदे काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आंबा व भाजीपाल्याची किरकोळ विक्री इतर ठिकाणी हलवली आहे.
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नवीन नियमावली तयार केली आहे. त्यानुसार भाजीपाल्याचे सौदे झाल्यानंतरच फळांचे सौदे काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आंबा व भाजीपाल्याची किरकोळ विक्री इतर ठिकाणी हलवली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. भाजीपाल्यासह शेतीमाल विक्री सुरू आहे. मात्र, बाजार समिती सौद्यादरम्यान गर्दी होत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बाजार समितीत शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या उपस्थित समिती प्रशासन, व्यापारी, अडत्यांची बैठक झाली.
भाजीपाला व फळ मार्केट जवळ आहे, त्यात एकाच वेळी सौद्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने गर्दी वाढते. यावर उपाय म्हणून पहाटे पाच ते सकाळी नऊपर्यंत भाजीपाल्याचे सौदे काढले जाणार आहेत.
फळ मार्केटमध्ये सौद्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचबरोबर घाऊक मार्केटमध्ये हापूस आंब्यासह इतर फळांची किरकोळ विक्री केली जाते. ही विक्री विठ्ठल मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंग ठेवून केली जाणार आहे. त्याचबरोबर किरकोळ भाजीपाला विक्री समितीच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस होणार आहे. बैठकीला बाजार समिती अशासकीय समितीचे सदस्य सूर्यकांत पाटील, सचिव जयवंत पाटील, महापालिकेचे अधिकारी, समितीशी संबंधित घटक उपस्थित होते.