‘पवार एके पवार’चे मुश्रीफांना फळ, सर्वाधिक काळ मंत्री राहणारे एकमेव आमदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:27 PM2019-12-31T12:27:58+5:302019-12-31T12:30:04+5:30
राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाल्याने ते सर्वाधिक काळ मंत्री म्हणून काम करणारे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील निष्ठा, विरोधकांना थेट अंगावर घेण्याची कसब आणि कितीही प्रलोभने आली तरी ‘पवार एके पवार’ या पलीकडे विचार न केल्यानेच त्यांना फळ मिळाले आहे.
कोल्हापूर : राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाल्याने ते सर्वाधिक काळ मंत्री म्हणून काम करणारे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील निष्ठा, विरोधकांना थेट अंगावर घेण्याची कसब आणि कितीही प्रलोभने आली तरी ‘पवार एके पवार’ या पलीकडे विचार न केल्यानेच त्यांना फळ मिळाले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचे निश्चित झाले, त्याचवेळी हसन मुश्रीफ यांचे मंत्रिपद निश्चित झाले होते. विशेष म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर अल्पसंख्याक समाजातील उपमुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार आग्रही होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या रात्रीतील सत्तानाट्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. पक्षाच्या स्थापनेपासून ते पाचव्यांदा निवडून आले आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट करण्याबरोबरच गेले पाच वर्षांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना थेट अंगावर घेतले. मुश्रीफ यांच्यासारखा अल्पसंख्याक समाजातील आणि आक्रमक नेता पक्षात घेण्यासाठी पाटील यांनी खुली आॅफर त्यांना दिली. मात्र, शरद पवार यांच्यावरील निष्ठेपुढे सगळे दुय्यम असे ठणकावून सांगत त्यांनी पाटील यांची आॅफर नाकारली. त्यानंतर आयकर विभागाचा छापा त्यांच्यावर पडला, तरीही ते नमले नाहीत. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या टार्गेटवर ते राहिले; मात्र ते विरोधकांना पुरून उरले. त्याचे फळ त्यांना मिळाले.
यापूर्वी रत्नाप्पाण्णा कुंभार, श्रीपतराव बोंद्रे, सदाशिवराव मंडलिक, दिग्विजय खानविलकर, जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, आदींनी मंत्री म्हणून काम केले. मात्र, १९९९ पासून २०१४ पर्यंत सलग साडेचौदा वर्षे आणि पुन्हा २०१९ ला मंत्री म्हणून संधी मिळणारे ते एकमेव आमदार आहेत.
शपथेमध्ये ‘सीमा भागासह संयुक्त महाराष्ट्र’
हसन मुश्रीफ यांनी सहाव्या क्रमांकावर दुपारी एक वाजून २० मिनिटांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी उपस्थित समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शपथेच्या शेवटी त्यांनी ‘जय हिंद, जय सीमा भागासह संयुक्त महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली.