इंधन दरवाढीचा एफआरपीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 04:03 PM2021-11-14T16:03:09+5:302021-11-14T16:04:43+5:30
डिझेलच्या दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम वाहतूक यंत्रणेवर झाला असून, साखर वाहतुकीच्या दरात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. ऊस वाहतुकीच्या दरातही आणखी वाढ होणार असून, पुढील हंगामात किमान १० टक्के वाढ होणार आहे
राजाराम लोंढे
कोल्हापूर : डिझेलच्या दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम वाहतूक यंत्रणेवर झाला असून, साखर वाहतुकीच्या दरात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. ऊस वाहतुकीच्या दरातही आणखी वाढ होणार असून, पुढील हंगामात किमान १० टक्के वाढ होणार आहे. टनामागे ६० ते ७० रुपयांची वाढ होणार असल्याने त्याचा फटका एफआरपीला बसणार आहे.
इंधनावर बाजारपेठेतील दर अवलंबून असतात. इंधन दरवाढ झाल्याने वाहतूक वाढते, परिणामी महागाई वाढतच जाते. गेल्या सहा महिन्यांत डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. शंभरी पार करून प्रतिलिटर १०५ रुपयांपर्यंत डिझेल पोहोचले होते. केंद्र सरकारने कर कमी केल्याने आता ९५ रुपयांवर स्थिर असले तरी ते कधीही पुन्हा शंभरी पार करू शकते. त्यामुळे वाहतुकीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील हंगामापेक्षा चालू हंगामात ऊस वाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, पुढील हंगामात यापेक्षाही वाढ होणार आहे. सध्या जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून ऊस तोडणी व वाहतुकीपोटी प्रतिटन ६२५ ते ७२५ रुपयांची कपात करून घेते. पुढील हंगामात त्यामध्ये किमान १० टक्के वाढ होणार असून, ही कपात प्रतिटन ६९० ते ७९० रुपयांपर्यंत जाणार हे निश्चित आहे. त्याचा परिणाम थेट एफआरपीवर होणार आहे. परिणामी पुढील हंगामातील एफआरपीमध्ये सरासरी ६५ रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
साखर वाहतुकीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डिझेलमध्ये प्रतिलिटर ४० ते ४५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दीड-दोन महिन्यापासून साखर वाहतुकीच्या दरातही वाढ झाली आहे. अंतरानुसार टनामागे १०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे.
रोज साखरेच्या ६०० गाड्या बाहेर
कोल्हापुरातून साखर घेऊन रोज साधारणत: ६०० गाड्या जातात. मुंबई, अहमदाबादला साखर जात असली तरी केरळ व कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात साखरेची वाहतूक होते.
दूध वाहतुकीचे दर जैसे थे
डिझेलच्या दरात वाढ झाल्याने इतर वाहतूक वाढली असली तरी ‘गोकुळ’ने दूध वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नाही. भविष्यात इंधनाच्या दरात वाढ झाली तर वाहतुकीचे दर वाढू शकतात.
अशी झाली साखर वाहतुकीमध्ये वाढ (२५ टन क्षमतेची गाडी)
मार्ग पूर्वीचा दर सध्याचा दर
कोल्हापूर-मुंबई ७५० ८५०
कोल्हापूर-पनवेल (बंधारापर्यंत) ७५० ८२०
कोल्हापूर - वाशी ९०० १०००
कोल्हापूर - अहमदाबाद १४०० १७००
कोल्हापूर - राजस्थान १८५० २०००
कोल्हापूर - केरळ २५०० २८००
कोल्हापूर - बंगलोर, मंगलोर, म्हैसूर २२०० २५००
गेल्या सात-आठ महिन्यांत डिझेलच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ होऊनही वाहतुकीच्या दरात २० टक्के वाढ केली. तरीही हा व्यवसाय परवडत नाही. - सुभाष जाधव (अध्यक्ष, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन)