शहरात ‘इंधन’ पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:12 AM2019-08-12T01:12:26+5:302019-08-12T01:12:31+5:30

कोल्हापूर : मिरज, हजारवाडी येथून आणलेले पेट्रोल, डिझेलचे पंधरा टँकर रविवारी सायंकाळी जेसीबीच्या मदतीने शिरोली येथून पुराच्या पाण्यातून शहराकडे ...

'Fuel' reached the city | शहरात ‘इंधन’ पोहोचले

शहरात ‘इंधन’ पोहोचले

googlenewsNext

कोल्हापूर : मिरज, हजारवाडी येथून आणलेले पेट्रोल, डिझेलचे पंधरा टँकर रविवारी सायंकाळी जेसीबीच्या मदतीने शिरोली येथून पुराच्या पाण्यातून शहराकडे पाठविण्यात आले; त्यामुळे आज, सोमवारपासून शहरातील बहुतांशी पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना पेट्रोल, डिझेल पुरेशा प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे.
गेले सहा दिवस महामार्ग बंद असल्याने पेट्रोल-डिझेलची शहरात प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील राजाराम रोड, स्टेशन रोड, आदी भागांत जणू अघोषित संचारबंदी असल्यासारखे वातावरण आहे. रविवारी सायंकाळी जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशन व इंडियन आॅईल, हिंदुस्तान आॅईल, भारत पेट्रोलियम, आदी कंपन्या व प्रशासनाच्या प्रयत्नाने रविवारी सायंकाळी एकूण पंधरा टँकर पाठविण्यात आले. हे टँकर शिरोली पुलाची येथे महामार्गावर पुराच्या तीन ते चार फूट पाण्यातून जेसीबीच्या साहाय्याने शहराकडे सुरक्षितरीत्या पाठविण्यात आले.
दिवसाकाठी शहराला सव्वालाख लिटर पेट्रोल, तर दीड ते दोन लाख लिटर डिझेल लागते. सद्य:स्थितीत लाख लिटर पेट्रोल, डिझेल आज, सोमवारपर्यंत शहरात पोहोचण्याची शक्यता डिलर्स असोसिएशनकडून वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे इंडियन आॅईल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी शिरोली येथे प्रथमच तळ ठोकून आहेत.
वादावादी आणि धमकी
जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्तांना मदत कार्य करणाऱ्या संस्था, शासकीय यंत्रणा, एनडीआरएफ, लष्कर, नौसेना आदींच्या बोटींना शिल्लक साठ्यातील पेट्रोल, डिझेल देण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी स्वत: जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी यांच्या सहीचे पास काढले आहेत. यात आम्हालाही पेट्रोल, डिझेल द्या म्हणून अनेक आततायीपणा करणाºया नागरिकांनी पेट्रोल पंपधारकांना धमकाविण्याचा प्रयत्न करीत होती.
सांगली फाट्यावर सहाव्या दिवशीही वाहतूक ठप्प
शिरोली : शिरोलीतील सांगली फाटा येथे महामार्गावर दोन्ही बाजूला पाणी आल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रविवारी सहाव्या दिवशीही ठप्प राहीली. महामार्गावरील पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतरच वाहतूक सुरू होईल. तोपर्यंत अत्यावश्यक सेवा कोल्हापूरला बोटीतूनच पुरवण्यात येणार असल्याचे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. रविवारी सकाळी महामार्गावर साडे तीन ते चार फुट पाणी होते. सकाळी आठ वाजता पोलीसांनी व एनडीआरआफच्या जवानांनी महामार्गावरील पूरात पोकलॅँड सोडून अंदाज घेतला त्यांनतर साडे नऊ वाजता २५ हजार लिटर पाण्याचा टॅँकर पाण्याचा कोल्हापूर शहरात पाठवण्यात आला. यानंतर दुपारी बारा वाजता एक पेट्रोलचा टॅँँकर पाठवण्यात आला पण पाण्याला गती खूप होती. यामुळे इतर कोणतेही वाहन दिवसभरात या पाण्यातून सोडले नाही. दिवसभरात एक पाण्याचा टॅँकर, सिलेंडरचे दोन ट्रक व पेट्रोल-डिझेलचे १५ टॅँकर शहरात पाठविण्यात आले. शनिवारी रात्री पासून (दि. १०) रविवारी सकाळ दहापर्यत पाण्याची पातळी अर्धा ते पाऊण फूटाने कमी झाली आहे. आद्याप साडे तीन ते चार फूट पाणी महामार्गावर आहे. त्यामुळे कोल्हापूरात जिवनावश्यक वस्तुचा पुरवठा आपत्कालीनच्या बोट मधूनच केला जाणार आहे.राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पूराचे पाणी आले असून, अनेक ठिकाणी महामार्ग बंद आहे. त्यामुळे बंगळूरकडे जाण्यासाठी सोलापूर मागार्चा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. देशमुख यांनी केले.

Web Title: 'Fuel' reached the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.