महाआवास अभियानातंर्गत घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:38 AM2021-02-23T04:38:32+5:302021-02-23T04:38:32+5:30
आजरा : महा-आवास अभियानांतर्गत सर्वसामान्य व गरजू कुटुंबांना घरकुल मिळावे, तालुक्याला मिळालेले उद्दिष्ट पूर्ण करून मोहीम यशस्वी करावी, असे ...
आजरा : महा-आवास अभियानांतर्गत सर्वसामान्य व गरजू कुटुंबांना घरकुल मिळावे, तालुक्याला मिळालेले उद्दिष्ट पूर्ण करून मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजऱ्यातील महा-आवास अभियानांतर्गत कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील होते.
स्वागत व प्रास्ताविकात लाभार्थ्यांनी १०० दिवसांत शासनाच्या नियम व अटीनुसार घरकुल पूर्ण करावयाचे आहे. लाभार्थ्यांच्या जागेबाबतच्या अडचणी सोडविल्या आहेत, असे गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी सांगितले. यावेळी घरकुल लाभार्थी, नूतन सरपंच व ग्रामसेवक यांचाही सत्कार करण्यात आला. उद्दिष्टांप्रमाणे पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून द्या. सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे मिळालीच पाहिजेत, असेही आमदार आबिटकर यांनी सांगितले.
सर्वसामान्य व ज्यांना राहण्याची सोय नाही अशा कुटुंबांना निवारा मिळाला पाहिजे. सरपंचांनी विकासासाठी गावचा विकास आराखडा तयार करावा व राजकारणविरहित काम करावे, असे आवाहन अध्यक्षीय मनोगतात आमदार राजेश पाटील यांनी केले.
यावेळी सभापती उदयराज पवार, पं. स. सदस्या रचना होलम यांनी मनोगत व्यक्त केले.
वीजवितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस. के. पोवार यांनी कृषी धोरण व वीज थकबाकीबाबत माहिती दिली.
कार्यक्रमास तहसीलदार विकास अहिर, जि. प. सदस्य जयवंत शिंपी, सुनीता रेडेकर, उपसभापती वर्षा बागडी, सहायक गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे यांसह अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.
--------------------------
* महाआवास योजनेतून २५४ कुटुंबांना मिळणार घरे
आजरा तालुक्याला या योजनेतून ४११ चे उद्दिष्ट आले आहे. त्यापैकी २५४ पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यांना १५ हजार रुपयांप्रमाणे पहिला हप्ता दिला आहे. ९० दिवसांपर्यंत प्रत्येक टप्प्याला अनुदानाची रक्कम दिली जाणार असल्याचे गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी सांगितले.
---------------------------
* फोटो ओळी : आजऱ्यातील महाआवास अभियान कार्यशाळेत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर. शेजारी विकास अहिर, आमदार राजेश पाटील, जयवंत शिंपी, उदयराज पवार व अन्य.
क्रमांक : २२०२२०२१-गड-०४