पूरस्थिती ‘जैसे थे’
By admin | Published: July 14, 2016 01:01 AM2016-07-14T01:01:21+5:302016-07-14T01:01:21+5:30
पावसाची विश्रांती : ८४ बंधारे पाण्याखाली; शंभरांवर गावांचा संपर्क तुटलेलाच; धरण क्षेत्रात धुवाधार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूर परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. कोल्हापूरशी तळकोकणाशी असलेला संपर्क अजूनही तुटला असून सहा गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. अद्याप ८४ बंधारे पाण्याखाली असल्याने शंभराहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर ओसरणार असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.
गेले पाच दिवस सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. सन २००५ ची पुनरावृत्ती होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती; पण बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला. दिवसभरात अधून-मधून जोरदार सरी कोसळत राहिल्या, पण गेले तीन-चार दिवस असणारा जोर काहीसा कमी झाल्याने कोल्हापूरकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाऊस कमी असला तरी पुराचे पाणी अद्याप ‘जैसे थे’च आहे.
इचलकरंजीत पावसामुळे पॉवरलूमची भिंत अंगावर पडून गुरुनाथ गुंटक (इचलकरंजी) यांचा मृत्यू झाला असून इतर ठिकाणी दोन जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. धरण क्षेत्रात अजूनही धुवादार पाऊस सुरू असून, पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण ७१ टक्के, वारणा ५८, दूधगंगा ३७ टक्के भरले आहे. शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण कोणत्याही क्षणी ‘ओव्हर फ्लो’ होण्याची शक्यता आहे. घटप्रभा धरणातून प्रतिसेकंद ३२५१ तर जांबरे धरणातून १२५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोदे लघु पाटबंधारे पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातून ६७० घनफूट विसर्ग सुरू असल्याने कुंभी नदीची पातळी ‘जैसे थे’ राहिली आहे.
पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, वळिवडे, आंबेवाडी, हातकणंगले तालुक्यातील घुणकी, नीलेवाडी तर शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावांचा संपर्क पूर्णत: तुटला आहे. चौदा नदीवरील ८४ बंधारे अद्याप पाण्याखाली असल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरू असली तरी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
‘गोकुळ’ला ४० हजार लिटरला फटका
गगनबावडा, करवीर तालुक्याचा पश्चिम भाग, राधानगरी, पन्हाळा तालुक्यातील बहुतांशी गावांचा संपर्क तुटल्याने वाहतूक ठप्प आहे. परिणामी दुधाची वाहतूक करता येत नसल्याने ‘गोकुळ’ दूध संघाचे संकलन सुमारे ४० हजार लिटरने कमी झाले आहे पण त्याचा वितरणावर परिणाम दिसत नाही.
उन्हामुळे उत्साह
माणूस चार दिवस तापाने फणफणला आणि जरा बरे वाटू लागल्यावर बाहेर जाण्याची इच्छा व्हावी, असेच काहीसे वातावरण बुधवारी सकाळी लोकांनी अनुभवले. कारण पहाटेपर्यंत कोसळणारा पाऊस सकाळ झाल्यावर मात्र गायब झाला. लख्ख सूर्यदर्शन झाले. रस्ते कोरडे झाले. वातावरण प्रसन्न झाले. लोकही रेनकोट न घालता कार्यालयाला गेले. बाजारपेठेतही गर्दी झाली. दुपारी बाराच्या सुमारास जोरदार सर आल्याने पाऊस पुन्हा पाठ सोडत नाही, अशी भीती व्यक्त झाली. दुपारनंतर मात्र पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली. दुपारीही चांगले ऊन पडले होते.