कोल्हापूरच्या औद्योगिक धोरणास संपूर्ण सहकार्य, उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही
By समीर देशपांडे | Published: April 23, 2024 06:59 PM2024-04-23T18:59:18+5:302024-04-23T19:00:15+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असून नवीन औद्योगिक वसाहती स्थापण्यासह कोल्हापूरमध्ये आय.टी.पार्क उभारण्यासह सर्वंकष धोरण बनवून ...
कोल्हापूर : कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असून नवीन औद्योगिक वसाहती स्थापण्यासह कोल्हापूरमध्ये आय.टी.पार्क उभारण्यासह सर्वंकष धोरण बनवून त्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. नवीन एमआयडीसीच्या माध्यमातून साडे सहाशेहे एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल असेही ते म्हणाले.
कोल्हापूर येथे मंगळवारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजतर्फे जिल्ह्यातील प्रमुख उद्योजकांची उद्योग मंत्र्यांसमवेत संवाद बैठक झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी होते. जिल्ह्यातील एमआयडीसीचा विस्तार, वीज दरवाढ तोडगा, पूर्वीच्या जागा हस्तांतरणावरील जीएसटी मागणी रद्द करणे, इलेक्ट्रॉनिक पार्कला मंजूरी, विस्तारीकरणासाठी जागेची उपलब्धता, वीज उपलब्धता, नवीन उद्योग आणणे, आय.टी.पार्क उभारणी आणि कोल्हापूर-सांगली विभागाला ‘फाऊंड्री हब’ घोषित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी उद्योजक विजय मेनन, प्रकाश राठोड, सुरेंद्र जैन, सचिन मेनन, प्रसाद मंत्री, भरत जाधव, आनंद देशपांडे, अजय सप्रे, सचिन शिरगांवकर, मंगेश पाटील, शंकर दुल्हाणी, रवि डोली, जयेश ओसवाल, अश्विनी दानीगोंड, प्रकाश मेहता, राजु पाटील, राहूल सातपुते, शितल संघवी, रणजित जाधव उपस्थित होते.