पाटील-मुश्रीफ युतीमुळे चर्चेला पूर्णविराम
By admin | Published: November 5, 2016 12:26 AM2016-11-05T00:26:27+5:302016-11-05T01:03:55+5:30
निवडणूक तिरंगी की दुरंगीवर चर्चा : मंडलिक आणि घाटगे गटाच्या युतीबाबत अद्याप अनिश्चितता
अनिल पाटील -- मुरगूड नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये युत्या, आघाड्या अनिश्चित होत्या. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांमध्ये याबाबत गोंधळाचे वातावरण होते. आमदार हसन मुश्रीफ मुरगूडमध्ये कोणता निर्णय घेणार? कागलमधील युतीचा मुरगूडमध्ये परिणाम होणार काय? मंडलिक-मुश्रीफ मुरगूडमध्ये एकत्र येणार काय? या आणि अशा अनेक चर्चा मुरगूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या, पण मुरगूडमध्ये येऊन कार्यकर्ते जरी नाराज असले, तरी मुश्रीफ यांनी मुरगूड नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस आणि पाटील गट एकत्र येऊन लढतील, अशी घोषणा केली. यामुळे मुरगूड आणि तालुक्यात सुरू असणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
नगरपालिका निवडणुकीतील एक आघाडी पक्की झाली आहे; पण सुरुवातीपासून एकत्र राहणार, असा होरा बाळगणाऱ्या समरजित घाटगे आणि संजय मंडलिक यांच्या युतीवर अद्याप शिक्कामोर्तब व्हायचे बाकी असल्याने मुरगूड शहरामध्ये निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार, याबाबत अनिश्चितता आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी मुरगूडमध्ये रणजितसिंह पाटील, प्रवीणसिंह पाटील यांच्या निवासस्थानी येऊन मुश्रीफ-पाटील युतीची घोषणा केली. अर्थात जागा वाटप अद्याप व्हायचे असले, तरी यावर या युतीचे घोंगडे अडणार नाही, हे मुश्रीफ व पाटील बंधंूनाही माहिती आहे. कारण राष्ट्रवादीच्या उमेदवारांची सर्व जबाबदारी मुश्रीफ यांच्यावरच आहे आणि तो जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असणार असल्याचे मुरगूडमधील मुश्रीफ समर्थकांनी सांगितले आहे.
अर्थातच ज्यावेळी मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यामध्ये वाद झाला, त्यावेळी मुरगूड परिसरामध्ये मुश्रीफ यांच्याबरोबर खंबीरपणे कोणीतरी असणे गरजेचे होते. ती जबाबदारी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यावर होती, पण जमादार यांना मुश्रीफ आणि पाटील यांची सलगी बोचू लागली आणि त्यातूनच जमादार यांनी मुश्रीफांशी काडीमोड घेत मंडलिक गटाच्या तंबूत जाणे पसंत केले. त्या वेळेपासून पाटील बंधू आणि मुश्रीफ यांच्यातील सख्य वाढले, हे त्रिकालबाधित सत्य आहे. त्यामुळे सर्वच निवडणुकीत मुश्रीफ आणि पाटील बंधू हे दोघे एकत्र पाहावयास मिळू लागले.
या युतीमुळे पाटील गटाला आणि मुश्रीफ गटाला फायदा झाला. मुरगूड शहराच्या विकासासाठी मुश्रीफ यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी मिळाला. शिवाय पाटील गटाला गोकुळ, शेतकरी संघ यामध्ये प्रतिनिधित्व मिळण्यास मुश्रीफांची मदत मिळाली. याउलट मुश्रीफांना मुरगूड परिसरात गटाला उभारी देण्यासाठी पाटील गटाची मोलाची मदत मिळाली, तरी सुद्धा मुरगूड नगरपालिका निवडणुकीत पाटील-मुश्रीफ युतीवर अनिश्चिततेचे ढग अगदी आजपर्यंत घोंगावत होते, त्याची कारणे वेगळी आहेत.
मुरगूड शहरातील मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांची पाटील गटाबरोबर जाण्याची मानसिकता नव्हती. हे मुरगूडमधील आणि कुरुकली येथील घोडेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीमधून दिसून आले. पाटील गटाचे नगरसेवक आम्हाला मिसळवून घेत नाहीत, असा आरोप मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. अर्थात पाटील गटाची तक्रार मांडताना या कार्यकर्त्यांची वेळ चुकली होती. कारण ज्यांची मुश्रीफ यांच्याबरोबर कायम युती होती, ते समरजित सरळसरळ भाजपमध्ये जाऊन मुश्रीफ यांच्या विरोधात जाण्याचे मनसुबे बांधत असताना, गटाला उभारी देण्याचे काम करणे गरजेचे असताना या कार्यकर्त्यांनी उणीदुणी काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या बैठकांमध्ये मुश्रीफही जाम भडकल्याची खात्रीलायक माहिती आहे.
याशिवाय कागलमध्ये मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यात युती झाली, तर मुरगूडमध्ये मंडलिक यांच्या विरोधात कसे लढायचे, त्यामुळे या युतीचा परिणाम मुरगूडमध्ये होईल आणि मंडलिक, मुश्रीफ, समरजित घाटगे व संजय घाटगे एकत्र येतील आणि सत्ताधारी पाटील गटाला खिंडीत पकडून त्यांची सत्ता हस्तगत करतील असाच अंदाज अनेकांनी बांधला होता, पण मुत्सद्दीपणे मुश्रीफ यांनी मुरगूडमध्ये येऊन पाटील गटाबरोबरची आघाडी झाल्याची घोषणा केली आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला.
येत्या दोन दिवसांत आघाडीचे उमेदवार घोषित होणार आहेत, पण १३ ठिकाणी पाटील गटाचे उमेदवार, चार ठिकाणी मुश्रीफ गटाचे उमेदवार, नगराध्यक्ष पाटील गटाचा आणि उपनगराध्यक्ष काही काळ मुश्रीफ गटाकडे राहणार असल्याचे समजते.
मंडलिक गटामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी
मंडलिक-घाटगे युती अद्याप अधांतरीच आहे. कारण मुरगूडमध्ये घाटगे गटाला किती जागा द्यावयाच्या, दिल्या तर कोणत्या प्रभागातील द्यावयाच्या, यावर घडामोडी होणे बाकी आहे. शिवाय मंडलिक गटामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने गट नेत्याला कोणाला थांब म्हणून सांगायचे, हा यक्षप्रश्न नक्कीच पडला असणार, असे दिसते. शिवाय समरजित घाटगे यांचा भाजप प्रवेशामुळे आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. त्यामुळे एका दुसऱ्या जागेवर ते समाधान मानणार नाहीत, असेच चित्र सध्यातरी दिसत असल्याने मुश्रीफ-पाटील आघाडी, मंडलिक गट व समरजित घाटगे गट अशी तिरंगी लढतीचा प्राथमिक अंदाज आहे.