रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनस्थळे ‘फुल्ल’
By admin | Published: December 29, 2014 09:54 PM2014-12-29T21:54:41+5:302014-12-29T23:36:57+5:30
उत्तरेच्या राज्यातील थंडीची लाट कोकण पर्यटनाच्या पथ्यावर...
रत्नागिरी : उत्तरेकडील राज्यात आलेली थंडीची लाट पाहता त्या राज्यात जाण्यातील धोका ओळखून पर्यटकांनी तिकडे पाठ फिरविली असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्याकडे पर्यटकांची मोठी रिघ लागली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे हाऊस फुल्ल झाली आहेत. काही लाख पर्यटकांनी गेल्या २५ डिसेंबरपासून गणपतीपुळेसह अन्य पर्यटनस्थळांना भेट दिली. मात्र, सर्वत्र हॉटेल्स, लॉजिंग व महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची निवास व्यवस्था फुल्ल झाल्याने अनेकांना निवास व्यवस्थेच्या सुविधेअभावी अन्यत्र जावे लागल्याचेही स्पष्ट झाले आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पर्यटन महामंडळाच्या प्रोत्साहनातून गावोगाव, किनारपट्टीवर व धार्मिक ठिकाणी मिळून ४४४ ठिकाणी निवास न्याहरी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच एमटीडीसीनेही रत्नागिरी जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळांच्या ठिकाणी १२७ निवासी रुम्सची व्यवस्था केली आहे. या सर्व ठिकाणी पर्यटकांसाठी अनेक चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
शासकीय व्यवस्थेतून कोकणात पर्यटकांना मोठ्या प्रमाणात न्याहरी निवास सुविधा देता येणे शक्य नसल्याने महाराष्ट्र पर्यटन महामंडळामार्फत निवास न्याहरी योजनेला चालना देण्यात आली. त्यामुळेच या योजनेतून खासगी क्षेत्रातून घराच्याच शेजारी पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा व भोजन व्यवस्थाही तयार झाली आहे.
गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकणाकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथेही पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वेळणेश्वर, हरिहरेश्वर, मार्लेश्वर व जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळीही पर्यटकांची सातत्याने गर्दी होत आहे. राज्यातील पर्यटक प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यात पर्यटनासाठी पसंती देतात. परंतु अलिकडच्या काही वर्षात पर्यटकांचा कल कोकणकडे, येथील निसर्गसौंदर्य व सागराकडे आहे. त्यातच यावर्षी नाताळ व थर्टीफर्स्टच्या हंगामात उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट आली आहे. काही ठिकाणी तापमान शून्य अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे धोकादायक वातावरणात उत्तरेकडील राज्यात पर्यटनासाठी जाण्यापेक्षा राज्यातील पर्यटकांनी कोकण व गोव्याला अधिक पसंती दिली आहे.
गोव्यातही पर्यटकांची गर्दी झाल्याने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याकडे अनेक पर्यटक वळले असून नाताळाची सुटीचा मनमुराद आनंद घेताना थर्टीफर्स्टच्या जल्लोषासाठी सज्ज झाले आहेत. उत्तरेकडील राज्यातील कडाक्याच्या थंडीमुळे कोकणातील तापमापकाचा पारा खाली आला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी तापमान १२ ते १५ अंशापर्यंत खाली आले आहे. तर अन्य भागात हेच तापमान १५ ते १८ अंशांच्या दरम्यान आहे. या सोसवणाऱ्या थंड हवामानामुळे जिल्ह्यात आलेले पर्यटकही सुखावले आहेत. पर्यटकांचा हा ओघ ३० व ३१ डिसेंबर २०१४ रोजी आणखीच वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्याला ३ लाख पर्यटकांची भेट
गेल्या चार दिवसांच्या काळात जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या गाड्यांची रिघ सुरू आहे. या काळात सुमारे तीन लाख पर्यटकांनी पर्यटन स्थळांना भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यटन महामंडळाच्या जिल्ह्यातील गणपतीपुळे व वेळणेश्वर येथील निवासांचे बुकिंग येत्या ३१ डिसेंबरपर्यंत फुल्ल आहे. निवास न्याहरी योजनेलाही भरभरून पर्यटकांची पसंती मिळत आहे. घरगुती जेवणावर पर्यटक ताव मारत आहेत.