डिझायनर पणत्यांची रोषणाई
By admin | Published: November 7, 2015 12:01 AM2015-11-07T00:01:27+5:302015-11-07T00:20:19+5:30
बाजारात गर्दी : साठ रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंचे विविध प्रकार उपलब्ध
कोल्हापूर : दिवाळीत दारात सजलेल्या रांगोळीवर पणती लावली की, त्या अंगणाचे सौंदर्यही खुलून उठते. या सजावटीत अधिक भर टाकण्यासाठी मातीच्या पारंपरिक पणत्यांसह गणपती, तुळशी वृंदावन, लक्ष्मी, सिरॅमिक, हँगिंगसह डिझायनर पणत्यांना सर्वांधिक मागणी आहे.
दिवाळी म्हटली की, आकाशकंदील, लाईटच्या माळांसोबत पणत्यांची खरेदी होतेच. किंबहुना, पणत्यांमध्ये लावल्या जाणाऱ्या दिव्यांना अधिक महत्त्व आहे. चार वर्षांपूर्वी केवळ लाल मातीपासून बनविलेल्या पारंपरिक पणत्या लावल्या जात असत; पण आता मात्र त्यांची जागा डिझायनर पणत्यांनी घेतली आहे. अशा डिझायनर पणत्यांनी बाजारपेठ काबीज केली आहे.
सिरॅमिकच्या पाना-फुलांच्या, बारीक नक्षीकाम असलेल्या, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या अशा अनेक विविध प्रकारच्या पणत्या आपल्याला पाहायला मिळतील. याशिवाय साध्या पणत्यांवर रंगांनी केलेली कसाकुसर, डिझाईन, तसेच कुंदन वर्क, लेस वर्क, मोती वर्क, अशा पणत्यांही सजावटीत आणि पूजेत रंगत आणतात. साध्या पणत्यांची किंमत दहा रुपये डझनपासून सुरू आहे, तर एलईडीच्या तसेच डिझायनर पणत्या ६० रुपये जोडीपासून ते पाचशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सजावट साहित्यांच्या दुकानांत पणत्यांचे विविध प्रकार ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.
तरंगणाऱ्या पणत्या..
फेंगशूई भारतातही अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. त्यात अगदी हॅपिमॅन, पिरॅमिडपासून ते वाजणाऱ्या, दारात अडकविल्या जाणाऱ्या घंट्यांपर्यंतचा समावेश आहे. यातच आता पणत्यांचीही भर पडली आहे. तरंगणाऱ्या पणत्याही घराघरांत दिसत आहेत. मध्यभागी मेणाच्या पणत्या आणि भोवतीने पाना-फुलांची सजावट केलेल्या या पणत्या लक्ष वेधतात.
सध्या फ्लोटिंगच्या (तरंगणाऱ्या) व एलईडीच्या दिव्यांना अधिक मागणी आहे. फ्लोटिंगचे दिवे अधिक आकर्षक असतात, तर एलईडी दिवे तुम्ही कोणत्याही लाईट कनेक्शनशिवाय वापरू शकता. शिवाय ते अन्यवेळी सणासमारंभालादेखील वापरता येतात.
- साईनाथ महामुनी (कलाकार)