दामदुप्पट योजनेचा फंडा : करारपत्रातील मेख, पैशांची जबाबदारी गुंतवणूकदारांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 12:44 PM2021-11-18T12:44:04+5:302021-11-18T12:46:31+5:30

विश्वास पाटील कोल्हापूर : गुंतवलेली रक्कम ३६ महिन्यात दामदुप्पट करुन देण्याचा फंडा सुरु करणाऱ्या कंपन्या करारपत्र लिहून देतात. मात्र, ...

Fund to double in 36 months Possibility of one thousand crore investment | दामदुप्पट योजनेचा फंडा : करारपत्रातील मेख, पैशांची जबाबदारी गुंतवणूकदारांचीच

दामदुप्पट योजनेचा फंडा : करारपत्रातील मेख, पैशांची जबाबदारी गुंतवणूकदारांचीच

Next

विश्वास पाटील
कोल्हापूर : गुंतवलेली रक्कम ३६ महिन्यात दामदुप्पट करुन देण्याचा फंडा सुरु करणाऱ्या कंपन्या करारपत्र लिहून देतात. मात्र, या करारपत्रात कायदेशीर पळवाट ठेवून गुंतवणूक म्हणून नव्हे तर कंपनीच्या विस्तारासाठी मी हे पैसे स्वत: हून देत आहे असे गुंतवणूकदारांकडून लिहून घेतले जाते. गुंतवणूकदारही बिनधास्तपणे त्यावर सह्या करतात. केवळ कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारे सुमारे एक हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

या कंपन्यांकडून जे करारपत्र दिले जाते, ते बुधवारी ‘लोकमत’ने मिळविले. या करारपत्रात कुठेच गुंतवणुकीचा उल्लेखच नाही. आम्ही एक कंपनी काढली असून, त्याच्या विस्तारासाठी मी स्वत:हून १० लाख रुपये तुम्हास देत आहे. ही रक्कम भांडवल म्हणून देत असून, ती तीन वर्षांपर्यंत तुमच्याकडेच राहील. कंपनीच्या वाढीसाठी मी मदत केली म्हणून कंपनी तुमच्या (म्हणजे पैसे देणाऱ्याच्या) खर्चासाठी ३० हजार रुपये देत आहे. त्यामुळे उद्या कुठे तक्रार झाली तर ही रक्कम तुम्ही स्वत:हून दिली असल्याची कागदोपत्री नोंद असल्याने काहीच करता येणार नाही.

अशा योजनांचे स्वरूप हे पिरॅमिडसारखे असते. जो सुरुवातीला गुंतवणूक करतो, त्याचे सर्व पैसे परत मिळालेले असतात. परंतु, अलीकडील काही वर्षांत ज्यांनी गुंतवणूक केली आहे, त्यांचे पैसे मिळताना अडचणी होऊ शकतात. पिरॅमिडमधील एखादी वीट निखळल्यावर तो जसा कोसळतो तसेच याचे स्वरूप असते. त्यामुळे तसे काही घडले तर त्याचे जिल्ह्याच्या व हजारो लोकांच्या अर्थकारणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामध्ये झालेली गुंतवणूक किमान एक लाखापासूनची आहे आणि ज्या गावांत त्याची सुरुवात झाली, तिथे दोन-तीन कोटींची रक्कम सहजपणे यामध्ये गुंतविण्यात आली आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्तमालिका सुरू केल्यावर जिल्ह्याच्या विविध भागातून फोन येत आहेत. अमुक गावात एवढ्या कोटींची गुंतवणूक झाली आहे, इतक्या गाड्या आल्या आहेत, अशीच माहिती त्यातून पुढे येत आहे. लाखांचा आकडा कोण बोलायलाच तयार नाही. सगळेजण कोटींत बोलत आहेत. त्यावरून या व्यवहाराची व्याप्ती लक्षात येऊ शकेल.

कंपनीचे दहा-दहा लोक शेअर मार्केटमध्ये दिवसरात्र व्यवहार करत असतात, असेही सांगण्यात येते. हे दहा लोक कोणत्या इमारतीत बसून शेअर मार्केटचे व्यवहार करतात हे कुणीच कधी तपासलेले नाही. एखादी फर्म जेव्हा गुंतवणूकदारासाठी शेअर्स घेते, तेव्हा त्याचा रिपोर्ट केला जातो. काँट्रॅक्ट नोट तयार केली जाते. शेअर्समध्ये जे काही व्यवहार होतील, त्याची सर्व माहिती पुढच्या क्षणाला गुंतवणूकदारास समजली जाते. गुंतवणुकीबाबतचा अभ्यास करण्यासाठी रिसर्च असतो. तसा या कंपन्यांचा रिसर्च आहे का, त्यांचे ब्रोकर्स कोण आहेत, तुमची रिसर्च टीम कुठे आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. कागदोपत्री कायदेशीर व्यवहाराची छाननी होत नसल्याचे चित्र दिसते.

हे कंपनीला विचारा..

- शेअर मार्केटमधील तेजी-मंदीचा उपयोग आम्ही करतो व त्यामध्ये तुमचे पैसे गुंतवून त्यातून पैसे मिळवून देतो असे सांगण्यात येते. काही जणांना आम्ही ऑईल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगण्यात येते.
- पैसे कुठेही गुंतवा, परंतु गुंतवणूकदारास परतावा देण्यासाठी त्या कंपनीकडे पैसे कोणत्या मार्गाने येतात हे कधीच सांगितले जात नाही आणि गुंतवणूकदारही त्याबद्दल त्यांना कधीच विचारत नाही. ज्
- यांनी गुंतवणूक केली आहे, त्यांनी तरी सुरक्षितता म्हणून जे लोक गुंतवणूक करा म्हणून सांगतात, त्यांच्याकडे यासाठी आग्रह धरला पाहिजे.

तू चाल पुढं गड्या..

या कंपन्यांचे जे कार्यक्रम होतात, ते डोळे दीपवून टाकणारे असतात. त्यावर प्रचंड पैसा खर्च केला जातो. त्यामुळे या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांना या जगाचा मोह पडतो. कोणत्याही कष्टाशिवाय लाखो रुपयांत कमाई होते हे दिसल्यावर लोक त्याकडे आपोआप आकर्षित होतात. या कंपन्यांचे जे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये तू चाल रं पुढं गड्या तुला भीती कशाची.. हे गाणे दाखविले जाते. गुंतवणूक कशी केली जाते, त्यातील रिटर्न्स कसे मिळतील याबद्दल एकही वाक्य त्यात दाखविले जात नसल्याचा अनुभव आहे.

Web Title: Fund to double in 36 months Possibility of one thousand crore investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.