Kolhapur: यशवंत पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना प्रत्येकी १५ लाखांचा निधी, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 01:06 PM2024-06-27T13:06:22+5:302024-06-27T13:07:19+5:30

जिल्हा परिषदेच्या विविध पुरस्कारांचे वितरण

Fund of 15 Lakhs each to Yashwant Awardee Gram Panchayats, Guardian Minister Hasan Mushrif Announces | Kolhapur: यशवंत पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना प्रत्येकी १५ लाखांचा निधी, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

छाया : नसीर अत्तार

कोल्हापूर : यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार विजेत्या मोठ्या ग्रामपंचायतींना १५ लाख व छोट्या ग्रामपंचायतींना १० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केली. कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार, आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, उत्कृष्ट ग्रामपंचायत, यशवंत सरपंच पुरस्कारांचे वितरण मुश्रीफ यांच्या हस्ते महासैनिक दरबार हॉल येथे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, शाहू महाराजांनी राधानगरी धरणाची उभारणी, सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा, शिक्षणासाठी अर्थसहाय्य, अस्पुष्यता निवारणाचा कायदा यासह अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिमत्ता जाणली होती, त्यांच्या उच्चशिक्षणाला शाहू महाराजांनी पाठबळ दिले. शाहू महाराजांनी समतेचा, पुरोगामी विचारांचा ठसा आपल्या समोर ठेवला आहे. रयतेसाठी, पर्यावरण रक्षणासाठी, प्रशासकीय क्षेत्राच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय, कार्य समाजाला मार्गदर्शक आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला समतेचा संदेश देशाला आजही मार्गदर्शक आहे. शाहू महाराजांच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळेच कोल्हापूर जिल्हा अनेक क्षेत्रांत अग्रेसर असून त्यांच्या विचारांनीच कोल्हापूरकरांची वाटचाल सुरू आहे. जिल्हा परिषदेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या आदर्श शाळा, दवाखाने, पशुसंवर्धन केंद्रे, सौरऊर्जेवर गावांचे विद्युतीकरण, अंगणवाड्यांचे सक्षमीकरण आदी नावीन्यपूर्ण उपक्रमांना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विविध विभागांतील काम उत्कृष्ट आहे. शाहू महाराजांनी शिक्षण, उद्योग, सहकार आदी अनेक क्षेत्रांच्या उन्नतीसाठी घेतलेले क्रांतिकारी निर्णय समाजाला आजही मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांनी वाटचाल करण्याचा आपण संकल्प करुया. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यापुढेही कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात सर्व बाबींत अग्रेसर ठरवूया. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी प्रास्ताविकातून जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी आभार मानले.

यावेळी माणगाव आणि पिंपळगाव बुद्रुकला जिल्हास्तरीय यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार वितरित करण्यात आला. माणगावचे सरपंच राजू मगदूम व गोलीवडेच्या ग्रामसेवक विद्या जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, मनिषा देसाई, अरुण जाधव, संभाजी पवार, शिल्पा पाटील, सचिन सांगावकर, अतुल आकुर्डे, डॉ.राजेश गायकवाड, डॉ. प्रमोद बाबर, मीना शेंडकर, वैजनाथ कराड, माधुरी परीट यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

जल्लोषी वातावरण

सर्वच पुरस्कार विजेत्यांना कोल्हापुरी फेटे बांधण्यात आले होते. बाराही तालुक्यांतून कुटुंबियांसह पुरस्कार विजेते यावेळी उपस्थित हाेते. पुरस्कार वितरण झाल्यानंतर सेल्फी आणि फोटो काढून घेण्यासाठी व्यासपीठावर पुरस्कार विजेत्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी एकसारखे पोशाख तर महिला सदस्यांनी सारख्या साड्या नेसल्या होत्या.

Web Title: Fund of 15 Lakhs each to Yashwant Awardee Gram Panchayats, Guardian Minister Hasan Mushrif Announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.