कोल्हापूर विमानतळाच्या भूसंपादनासाठी २१२ कोटींचा निधी, पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 11:21 AM2022-04-19T11:21:10+5:302022-04-19T11:21:38+5:30
या विमानतळ विस्तारीकरणासाठी यापूर्वी ५३ कोटी रुपये इतक्या निधीला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यापैकी उर्वरित २६ कोटी रुपयांचा निधी दि. २१ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यात आला.
मुंबई : कोल्हापूरविमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादनासाठी २१२ कोटी २५ लाख रुपये इतक्या निधीसाठी मान्यता देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. ही मान्यता निश्चितपणे कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर विमानतळ हे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याकरिता विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २५.९१ हेक्टर जमिनीचे संपादन करणे गरजेचे होते. त्यासाठी निधीची आवश्यकता होती. या विमानतळ विस्तारीकरणासाठी यापूर्वी ५३ कोटी रुपये इतक्या निधीला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यापैकी उर्वरित २६ कोटी रुपयांचा निधी दि. २१ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यात आला.
विस्तारीकरणाच्या पुढील निधीसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांनी २१२ कोटी २५ लाख इतक्या निधीचा प्रस्ताव प्रशासकीय व वित्तीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाच्या शक्ती प्रदत्त समितीची मान्यता मिळणे आवश्यक होते. या समितीने सोमवारच्या बैठकीत माझ्या मागणीचा सकारात्मक विचार करीत विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २१२ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीच्या प्रस्तावास मान्यता दिली.
त्यासाठी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विमानचालन संचालनालयाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविकास आघाडी सरकार हे जनतेचे सरकार असून, राज्याच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. कोल्हापूर विमानतळासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानतो.
कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळाचा होत असलेला विस्तार महत्त्वपूर्ण आहे. विमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादनासाठी २१२ कोटी २५ लाख रुपये इतक्या निधीसाठी मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध क्षेत्रातील कोल्हापूरचे महत्त्व हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून सोमवारी झालेल्या बैठकीत अधोरेखित करण्यात आले आहे. - सतेज पाटील, पालकमंत्री