चंदगड मतदारसंघातील १३ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी साडेचार कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:35+5:302020-12-07T04:18:35+5:30
चंदगड : चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील जवळपास १३ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ४.५० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती ...
चंदगड :
चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील जवळपास १३ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ४.५० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती पाटबंधारे शाखाधिकारी तुषार पवार यांनी दिली.
आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी १३ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खास बाब म्हणून या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला आहे.
कोवाड बंधाऱ्यासाठी निधी मंजूर होण्यासाठी विभागीय कार्यालयाकडे पाठवले आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर जानेवारीमध्ये या बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. दगडी पिलरऐवजी कॉंक्रीटचे पिलर बांधण्यात येणार आहेत.
कर्टन वॉलबरोबर वरती रेलिंगही करण्यात येणार आहे
सध्या अडकूरजवळील गणुचीवाडी बंधारा दुरुस्तीचे काम चालू आहे. याबरोबरच ताम्रपर्णी नदीवरील माणगाव, कोवाड, हल्लारवाडी, कोकरे, कामेवाडी, घटप्रभा नदीवरील गणुचीवाडी, बिजूर, भोगोली, तारेवाडी, आदी हिरण्यकेशी नदीवर असणाऱ्या खणदाळ, गिजवणे, चांदेवाडी, हाजगोळी, आदी बंधारे दुरुस्त करण्यात येणार आहेत.
या बंधाऱ्याच्या ठिकाणी असलेल्या चौक्या मोडकळीस आल्या आहेत. त्यांचीही दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे शाखाधिकारी तुषार पवार यांनी दिली.
-------------------------
फोटो ओळी : कोवाड (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे कोसळलेले पिलर.
क्रमांक : ०६१२२०२०-गड-०८