डोणेवाडीत मूलभूत सोयींची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:56 PM2018-06-03T23:56:30+5:302018-06-03T23:56:30+5:30
रमेश साबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा तारळे : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अनेक खेडी तसेच गावं विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन स्वयंपूर्ण होत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असताना दुसरीकडे मात्र राधानगरी तालुक्यातील तळगांवपैकी डोणेवाडी हे गाव, स्वातंत्र्याची सत्तर वर्षे पूर्ण झाली तरीही रस्ते, वीज, पाणी, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून कोसो मैल दूर असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
ग्रुप ग्रामपंचायत तळगांव अंतर्गत सात वाड्यांपैकी एक असणारी डोणेवाडी. दहा-बारा घरे असणाऱ्या या वाडीची लोकसंख्या म्हणाल तर, जवळपास शंभरच्या घरात. तळगाव पासून तीन किलोमीटर दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेली वाडी. अगदी दोन वर्षांच्या बालकापासून ते ऐंशी वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्ती येथे वास्तव्य करतात. शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय पण, तोही पावसाच्या पाण्यावर. गावात रस्ता नसल्याने तळगांवपासून तीन किलोमीटर डोंगरदºयातील पायवाटेचा आधार घ्यावा लागतो. कुणीतरी आजारी पडलं तर याच पायवाटेने डोलीच्या साहाय्याने त्याला तळगावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आणावे लागते. गावात अंगणवाडी नसल्याने येथील मुलांना थेट पहिलीला प्रवेश दिला जातो. शाळेसाठी जाणारा रस्ता खूपच अडचणीचा असल्याने अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. पावसाळ्यात तर येथील नागरिकांना जिवंतपणी मरण यातना सोसाव्या लागत आहेत.
गावात वीज नसल्याने येथील नागरिकांना अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. रेशनकार्डवर महिन्यातून एकदा मिळणाºया अत्यल्प प्रमाणातील रॉकेलवरच घरातील कामे तसेच मुलांना अभ्यास करावा लागतो. घरांसभोवताली दुर्गम आणि डोंगराळ भाग असल्याने जंगली श्वापदे नागरी वस्तीकडे येतात. सहा वर्षांपूर्वी येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरलेले आहेत. त्यापासून वीज आज येणार, उद्या येणार, या आशेवरच अधिकाºयांनी ठेवले आहे. याबाबत वारंवार हेलपाटे मारुनही वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना या गोष्टीचे गांभीर्य नसल्याचे येथील नागरिक सांगतात. येथील नागरिकांना जंगलातील जिवंत झºयाचा शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आधार घ्यावा लागतो. नळ योजना नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. डिसेंबर-जानेवारीमध्ये असणारे हे पाणी फेब्रुवारीनंतर अत्यल्प प्रमाण असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत जातो. निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ पातळीवरील नेत्यांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वजण येथे येऊन रस्ते, वीज, पाणी, पूर्ततेचे आश्वासन देतात; मात्र, निवडणुका झाल्या की दिलेल्या आश्वासनांचा नेत्यांना विसर पडतो असे येथील नागरिकांनी सांगितले.