पैशाच्या हव्यासापोटी घडले भू्रण हत्याकांड!

By admin | Published: March 5, 2017 11:27 PM2017-03-05T23:27:37+5:302017-03-05T23:27:37+5:30

जिल्हा हादरला : मुलगी म्हणूनच गर्भपात; गरोदर मातांचे कुटुंबही म्हैसाळमधील घटनेस जबाबदार

Fundamentalist money laundered money! | पैशाच्या हव्यासापोटी घडले भू्रण हत्याकांड!

पैशाच्या हव्यासापोटी घडले भू्रण हत्याकांड!

Next



सचिन लाड ल्ल सांगली
‘सोनोग्राफी’ केंद्रे सील केली... रुग्णालयांवर दगडफेक झाली... अनेक डॉक्टरांच्या हातांना बेड्या ठोकल्या... त्यांनी तुरुंगाची हवाही खाल्ली... काही डॉक्टरांना शिक्षा झाली... तरीही जिल्ह्यात कोवळ्या कळ्यांचे मारेकरी अजूनही शांत बसलेले नाहीत. शहर आणि जिल्ह्यात आजही मुलगी नको म्हणून महिलांचा गर्भपात केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार म्हैसाळ (ता. मिरज) येथील घटनेवरुन अधोरेखित झाला आहे. पैशाच्या हव्यासापोटी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्यासह अनेकांनी एकत्र येऊन सामूहिक भ्रूण हत्याकांड घडविल्याचे समोर आले. जिल्ह्यातील या सर्वात मोठ्या हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे.
शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रसुतीची खासगी रुग्णालये आहेत. या प्रत्येक रुग्णालयात ‘येथे गर्भलिंग निदान तपासणी केली जात नाही; तसे करणे कायद्याने गुन्हा आहे’, असे फलक ठळकपणे लावलेले आहेत. पण या फलकामागून उघडपणे गर्भपातासारखे उद्योग केले जातच आहेत. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती प्रवीण जमदाडे (वय २५) या विवाहितेच्या गर्भाशयात मुलगी असल्याने तिचा डॉ. खिद्रापुरे याने गर्भपात केला. तिचा मृत्यू झाल्याने, जिल्ह्यात आजही चोरुन गर्भपात केले जात असल्याचे स्पष्ट होते. याला डॉक्टरबरोबरच गरोदर महिलांच्या सासरकडील लोकही तेवढेच जबाबदार आहेत. बाबासाहेब खिद्रापुरे सांगलीपासून जवळच असलेल्या शिरोळ तालुक्यातील कनवाड गावचा... दहा वर्षापूर्वी त्याने म्हैसाळमध्ये ‘भारती’ या नावाने आलिशान व सर्वसोयीने सुसज्ज असे रुग्णालय सुरु केले. बीएचएमएस पदवी असतानाही त्याने पडद्याआड राहून गर्भपाताचा उद्योग सुरु केला. पोलिसांनी त्याच्या मुळावर घाव घालून, आजपर्यंत त्याने केलेल्या सर्व दुष्कृत्यांचा पर्दाफाश केला आहे. हत्याकांडात त्याच्यासोबत सहभागी असलेल्यांचेही पाळेमुळे शोधली जात आहेत.
पोलिसांना सापडलेले १९ भ्रूण हे तीन महिने वयोगटातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोठे भ्रूण खिद्रापुरे विल्हेवाट लावण्यासाठी द्यायचा. यासाठी त्याने ते दफन करण्याचे ठरविले. अंधार पडला की, हे भ्रूण गावातच ओढ्यालगत पुरले जात होते. जिल्ह्यासह कर्नाटकातील महिलाही त्याच्याकडे गर्भपात करण्यास येत होत्या, अशी माहिती रुग्णालयातील रजिस्टरवरुन मिळाली आहे.
...त्यांचेही हात रक्ताने माखलेले
पोलिसांना आढळलेले १९ भ्रूण ज्या कुटुंबांशी संबंधित आहेत, त्यांचाही या हत्याकांडात तितकाच सहभाग आहे. मुलगी नको म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर एका बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर लोक जात असतील, तर समाजातील स्त्री-भ्रूणविरोधी भयावह मानसिकताही स्पष्ट होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर जनजागृती होऊनही अशा संवेदनाशून्य विचित्र लोकांची गर्दी आपल्या अवतीभोवती असल्याची बाब तितकीच चिंताजनक आहे.
सांगली जिल्ह्यात बीडचा वाईट ‘पॅटर्न’
कोल्हापुरात दोन वर्षापूर्वी गर्भपाताचे रॅकेट उघडकीस आले होते. त्याचे धागेदोरे सांगलीपर्यंत आले होते. यापूर्वी इस्लामपूर, ताकारी, सावळज, शिराळा, दिघंची येथील डॉक्टरांवर कारवाई झाली आहे. म्हैसाळसारख्या सीमावर्ती गावात आपले दुकान थाटून कोवळ्या कळ्या खुडण्याचे काम बीडच्या डॉ. मुंडे याच्यासारखेच खिद्रापुरेकडून येथे राजरोस सुरू होते. कायद्याची नजर चुकवून हे ‘पातक’ केले जायचे. दफन केलेले भ्रूण सापडल्याने खळबळ उडाली आणि कायद्याचे हात तिथपर्यंत पोहोचले.
रुग्णालयाबाहेर
बंदोबस्त
मणेराजुरीतील विवाहितेचे मृत्यू प्रकरण पेटल्यानंतर
डॉ. खिद्रापुरे फरार झाला. पोलिसांना त्याच्या कृत्याची माहिती मिळताच त्याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. त्याच्या रुग्णालयाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रुग्णालयातील कर्मचारीही
गायब झाले आहेत.
सांगलीत आज बैठक
म्हैसाळमध्ये भ्रूणहत्येचे रॅकेट उजेडात आल्यानंतर तपासाच्या दृष्टीने सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडूनही तपासासाठी मदत घेतली जाणार आहे.

Web Title: Fundamentalist money laundered money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.